विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. ७ ऑगस्टला ती होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना, तसेच अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना अपात्र न ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला होता. त्या निर्णयांना उद्धवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी, तर शरद पवार गटातर्फे जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. 30 जुलैला उद्धवसेनेची याचिका अॅड. कपिल सिब्बल यांनी मेन्शन केली. शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकाच वेळी सुनावणीस त्यांनी हरकत घेतली.
त्यावर सरन्यायाधीशांनी दोन्ही प्रकरणे परस्परांशी जोडली जाणार नाहीत, पण त्यांची सुनावणी 7 ऑगस्टलाच होईल, असे स्पष्ट केले. तथापि, सुप्रीम कोर्टाच्या संगणकीय वेळापत्रकात शिवसेनेच्या सुनावणीची तारीख 6 ऑगस्ट, तर राष्ट्रवादीच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख 3 नोव्हेंबर दाखवण्यात आली आहे. यात शिंदेसेनेचे म्हणणे पूर्वीच सादर केले आहे. तर अजित पवार गटाला म्हणणे सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे.
उद्धवसेनेच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंनी तर शरद पवार गटाच्या 13 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अपात्रतेवर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती गोगावलेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर ही दोन्ही प्रकरणे कुठे चालवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App