विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले आणि राहूल गांधी यांचे पक्षांतर्गत कट्टर शत्रू माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये गुफ्तगू झाले. ही शरद पवार यांची चाणक्यनिती होती की आझाद यांना आणखी उचकविण्याचा डाव आहे, अशी चर्चा रंगली आहे.Sharad Pawar’s talk with Rahul Gandhi’s staunch opponents
भाजप विरुद्ध विरोधी पक्षांचे ऐक्य मजबूत करण्याविषयी या बैठकीत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे मानले जात असले, तरी या बैठकीत नेमके काय शिजले, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. पवार दिल्लीत असले की, त्यांची आझाद यांच्यासोबत नियमित बैठक होत असते, असे पवारांच्या निकटवतीर्यांचे म्हणणे आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आझाद यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांनी सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसप्रणीत यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे सोपविण्याचा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केल्यानंतर पवार-आझाद भेटीकडे महत्त्वाची घडामोड म्हणून बघितले जात आहे.
आझाद यांच्या नेतृत्वाखालील सुमारे दोन डझन असंतुष्ट काँग्रेस नेत्यांपैकी महत्त्वाच्या नेत्यांशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संवाद साधला आहे; पण, त्यातून ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही. यूपीएचे नेतृत्व करण्यास काँग्रेस सक्षम राहिलेली नसल्याचे मत अनेक भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांना वाटत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणाºया भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बैठक बोलावली आहे; पण, या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहण्यास इच्छुक नाही.
या पार्श्वभूमीवर पवार यांच्या निवासस्थानी आझाद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी नेमक्या कोणत्या रणनीतीवर चर्चा झाली असेल, याविषयी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उभय नेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यास बाधक ठरणारे गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील भूमिकेवरही गहन चर्चा झाल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App