काँग्रेसचे नेते पाहताहेत 2004 चे स्वप्न, पण त्यांना 1969 पाहायला नाही लागले म्हणजे मिळवलीन!!

Priyanka Gandhi may split Congress like her grandmother indira Gandhi

लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यातले मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असताना काँग्रेसचे बरेचसे वरिष्ठ नेते “2004” चा चमत्कार पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. अगदी त्यामध्ये शशी थरूर यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांचाही त्यामध्ये समावेश आहे, इतकेच काय पण शरद पवारांनाही तीच आशा आहे. त्यामुळेच त्यांनी कधी नव्हे, तो लोकसभेच्या जागांच्या आकड्यात आपला अंदाज वर्तवून राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात 10 पैकी 8 ते 9 जागा मिळण्याचा आणि काँग्रेसला 17 पैकी 10 ते 12 जागा मिळण्याचा दावा केला आहे. वास्तविक शरद पवार कधी अशी थेट जागांची आकडेवारी सांगण्याची रिस्क घेत नाहीत पण यावेळी त्यांनी ती घेतली आहे. Priyanka Gandhi may split Congress like her grandmother indira Gandhi

अर्थात लोकसभा निवडणुकीत एवढे मोठे यश मिळणे म्हणजे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पवारांच्या राष्ट्रवादीने आणि राहुल गांधींच्या काँग्रेसने 90 % मार्क मिळवण्यासारखे आहे. आता तेवढे मार्क मिळतील का नाही??, हे पाहायला 4 जूनची वाट पाहावी लागेल, पण त्या पलीकडे जाऊन शशी थरूर यांनी 4 जून नंतर नव्या सरकारचे फॉर्मेशन सांगून टाकले आहे. 4 जून रोजी देशात असा “चमत्कार” घडेल की, “इंडिया” आघाडीत आणि बाहेर काँग्रेसशी भांडणारे पक्ष एकत्र येतील. त्यात तृणामूळ काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासारख्या पक्षांचाही समावेश असेल आणि सगळे पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधातले सरकार केंद्रात स्थापन करतील, असा त्यांनी दावा केला आहे.



2004 मध्ये अटल बिहारी सरकारला पूर्ण अनुकूल वातावरण असताना आणि देशांमध्ये शायनिंग इंडियाची जोरदार चर्चा असताना भाजपला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. 2024 मध्ये तशाच पराभवाचा सामना भाजपला करावा लागेल, असा काँग्रेससह सर्व विरोधकांचा होरा आहे. तो होरा गृहीत धरूनच शरद पवार आणि शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी 2004 च्या चमत्काराची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता पवार आणि थरूर यांच्यासारख्या दोन प्रगल्भ नेत्यांनी 2004 ची “आशा” दाखवल्यानंतर बाकीच्या काँग्रेस नेत्यांच्याही आशा प्रज्वलित न झाल्या तरच नवल. त्या “मशालींचे” प्रज्वलन 4 जून पर्यंत तरी जसेच्या तसे राहायला काही हरकत नाही.

पण दरम्यानच्या काळात राहुल गांधींच्या रायबरेलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात जी कुजबूज सुरू आहे, ती मात्र थेट काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची आहे. जर पुत्र मोहापायी महाराष्ट्रात शिवसेना फुटू शकते, तर तशाच पुत्र मोहापायी राष्ट्रीय पक्ष काँग्रेसही फुटू शकतो, अशी कुजबूज दिल्लीत सुरू असल्याची बातमी आहे.

काँग्रेसचे एकेकाळचे कट्टर समर्थक प्रमोद कृष्णन यांनी तर ती शक्यता उघडपणे बोलून दाखवली आहे. 4 जून नंतर काँग्रेसमध्ये एकीकडे प्रियांका गांधींची काँग्रेस असेल दुसरीकडे राहुल गांधींची काँग्रेस असेल, असा त्यांनी दावा केला आहे. हा दावा जसाच्या तसा खोडून काढणे शक्य असले, तरी राजकीय परिस्थितीबाबत मात्र तसेच म्हणता येईल, याची अजिबात खात्री नाही. कारण सोनिया गांधींनी जर आपला निर्णायक कौल खरंच राहुल गांधींच्या पारड्यात टाकला आणि प्रियांका गांधींना त्यांच्या मूलभूत राजकीय हक्कापासून वंचित ठेवले, तर प्रियांका गांधी आपल्या आजीला स्मरून बंडखोरी करणारच नाहीत, याची कोणीही गॅरंटी देऊ शकणार नाही!! अर्थात प्रियंका गांधींच्या बंडखोरीची वेळ 2024 ते 2029 या 5 वर्षांमधली कधीचीही असू शकते.

राहुल गांधींना अमेठी ऐवजी वायनाड मध्ये उतरवून काँग्रेसने सेफ गेम केल्याचे बोलले जात असले तरी, प्रत्यक्षात ती अर्धवट गेम असू शकते. कारण राहुल गांधींना वायनाड मध्ये विजयाची खात्री नाही म्हणूनच ते रायबरेलीत गेले या शक्यतेला काँग्रेस मधूनच बळकटी दिली गेली आहे. अशा स्थितीत काँग्रेसची सर्वच्या सर्व सूत्रे राहुल गांधींच्या हाती सोपवणे आणि पक्षांतर्गत सत्ता संतुलन टिकवण्याऐवजी प्रियांका गांधींना पूर्ण वगळणे हे काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर घातक ठरू शकते. मूळातच सत्ता संतुलनाच्या राजकारणाला मूठमाती देऊन सतत गटबाजीचे राजकारण केल्याने आधीच काँग्रेस खिळखळी झाली आहे. त्या खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसमध्ये उरल्या सुरल्या सत्तेचेही संतुलन राखले नाही, तर ती आणखीनच खिळखिळी होईल, हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही.

याचा अर्थ राहुल गांधींच्या हातातून काँग्रेसची सूत्रे काढून संपूर्णपणे प्रियांका गांधींच्या हातात ते दिल्याने फार मोठा फरक पडेल आणि तो तातडीने पडेल, असे समजण्याचे अजिबात कारण नाही. कारण त्यासाठी प्रियांका गांधींना भरपूर कष्ट उपसावे लागतील आणि आजीचे नेतृत्व गुण आपल्याच आहेत हे सिद्ध करावे लागेल, पण हे सिद्ध करण्याची संधीच जर राहुल गांधींच्या ताब्यातल्या काँग्रेसमध्ये मिळणारच नसेल, तर प्रियंका गांधी यांच्यापुढे देखील 1969 सारख्याच आजी समोर म्हणजे इंदिरा गांधींसमोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याखेरीज दुसरा काय पर्याय उरतो??

– 1969 : सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट

1969 मध्ये इंदिरा गांधींना पक्षातल्या दिग्गज नेत्यांना तोंड देताना काँग्रेस पक्ष फोडावा लागला होता. एकतर पंतप्रधान म्हणून सरकारवर आपले पूर्ण नियंत्रण असेल आणि पक्षावरही आपले नियंत्रण चालेल, हा इंदिरा गांधींचा हट्ट होता, तर इंदिरा गांधींनी दिलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार पाडून मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम या ज्येष्ठ नेत्यांना पक्ष आणि सरकारवर आपले नियंत्रण प्रस्थापित करायचे होते. इंदिरा गांधींना पूर्ण बाजूला करायचे होते. सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट असा त्यावेळी जबरदस्त संघर्ष झाला होता. इंदिरा गांधींनी आपले राजनैतिक कौशल्य वापरून या सर्व ज्येष्ठांना पराभूत केले होते आणि काँग्रेसवर पूर्णपणे स्वतःचे वर्चस्व स्थापले होते. दोनच वर्षांनी म्हणजेच 1971 मध्ये घेतलेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींनी जनमानसातले आपले स्थान काँग्रेसमधल्या बाकी सर्व नेत्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले होते.

प्रियांका गांधींना काँग्रेस मधले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी 1969 चा प्रयोग छोट्या प्रमाणावर का होईना, पण करावा लागेल, अशी स्थिती 4 जून 2024 नंतर आल्यास आश्चर्य वाटायला नको. प्रियांका गांधी तसे करतील की नाही??, केले तर त्याचे परिणाम काय होतील??, प्रियांका गांधींच्या बंडखोरीच्या मशाली काँग्रेस मधून पेटतील, पण त्यांना इंधन कुठून + कसे पुरवले जाईल??, 24 अकबर रोडवर येणारी इंधनाची लाईन बाराखंबा रोड मार्गे येईल का??, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आगामी काळच देईल, पण तशी राजकीय चिन्हे मात्र आत्तापासूनच दिसायला लागली आहेत, एवढे मात्र निश्चित म्हणता येईल.

Priyanka Gandhi may split Congress like her grandmother indira Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात