वृत्तसंस्था
कीव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narndra Modi ) यांनी शुक्रवारी युक्रेनला भेट दिली. कीव्हमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की ( Zelensky ) यांची भेट घेतली. पीएम मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाबाबतही पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी दोघांनाही एकमेकांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रत्येक प्रयत्नात सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दोन्ही बाजूंनी एकत्र बसावे – पंतप्रधान मोदी
राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर मीडियाशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही बाजूंनी एकत्र बसून या संकटातून मार्ग काढला पाहिजे. आज मला तुमच्याशी युक्रेनच्या भूमीवर शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर विशेष चर्चा करायची आहे.
शांततेसाठी भारत प्रत्येक प्रयत्नात सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांना दिले. मी वैयक्तिक यात योगदान देऊ शकलो तर मला नक्कीच ते करायला आवडेल. एक मित्र म्हणून मी तुम्हाला याची खात्री देऊ शकतो.
पीएम मोदी म्हणाले की युक्रेनच्या लोकांना हेदेखील माहित आहे की भारताने शांतता प्रयत्नांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे आणि त्याचा दृष्टिकोन लोककेंद्रित आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनसह संपूर्ण जागतिक समुदायाला मी खात्री देऊ इच्छितो की ही भारताची वचनबद्धता आहे आणि आमचा विश्वास आहे की सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे आणि आम्ही त्याचे समर्थन करतो.
पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत रशियाचा दौरा आणि त्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला आणि ही युद्धाची वेळ नसल्याचे स्पष्ट शब्दांत त्यांनी रशियाच्या अध्यक्षांना सांगितले असल्याचे म्हटले.
पीएम मोदी म्हणाले की, मी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, कोणत्याही समस्येचे समाधान युद्धभूमीत कधीच सापडत नाही. संवाद, संवाद आणि मुत्सद्देगिरीतूनच तोडगा निघतो आणि वेळ न घालवता त्या दिशेने वाटचाल करायला हवी.
पंतप्रधान मोदी यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून भारताचे पंतप्रधान पहिल्यांदाच युक्रेनच्या भूमीवर आले असल्याचे सांगितले. 1991 मध्ये युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे आणि युक्रेनने अलीकडेच रशियन हद्दीत आक्रमक लष्करी कारवाया सुरू केल्या असताना ही भेट झाली आहे.
युद्धाच्या सुरुवातीला भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबद्दल मोदींनी झेलेन्स्की यांचे आभार मानले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून आजतागायत दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे.
पंतप्रधान मोदी सकाळी विशेष ट्रेनने कीव्ह येथे पोहोचले आणि युक्रेनच्या पहिल्या उपपंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदींनी युक्रेनसोबत व्यापार, आर्थिक मुद्दे, संरक्षण, औषध, कृषी आणि शिक्षण यावर चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, भारत युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करेल. संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे ते म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more