अबकी बार 400 पार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही नव्यानेच आकडा सांगितलेला नाही. तो साधारण गेले 6 महिने भाजप मधल्या अंतर्गत वर्तुळातल्या मंथनाचा आणि त्या पाठोपाठ माध्यमांमधल्या चर्चेचा राहिला आहेच. पण काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार 400 पार ही घोषणा आपल्या पक्षाच्या खासदारांकडून करवून घेतली, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी भाजपचा जो 370 चा आकडा सांगितला, त्याचा नेमका अर्थ काय??, याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन विचार करायची गरज आहे.PM Modi wants to outperform PM Nehru and PM Indira Gandhi in popularity by securing 370 seats for BJP
कारण आत्तापर्यंत भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष अबकी बार 400 पार हीच घोषणा वारंवार देत होते. निवडणुकीत प्रत्येक पक्ष अशा प्रकारच्या घोषणा देतच असतो. त्यामध्ये फार काही विशेष नाही, पण पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेतल्या भाषणात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA साठी 400 पार आणि भाजपसाठी 370 हा आकडा सांगितला. आपण आकड्यांच्या जंजाळात अडकत नाही, असेही सांगून ते मोकळे झाले, पण तरी देखील भाजपचा 370 आकडा हा पंतप्रधान मोदींनी नेमका कुठून काढला?? त्या आकड्याचा भाजपशी नेमका राजकीय संबंध काय??, याचा थोडा नेमकेपणाने शोध घेतला, तर जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटवल्याचा त्याच्याशी काही प्रमाणात संबंध जोडता येईल.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिराच्या मुद्द्यापाठोपाठ आम्ही भाजपच्या विचारप्रणालीनुसार 370 कलम काश्मीर मधून हटवून दाखवले, हे मतदारांवर कायमचे ठसवण्यासाठी मोदींनी 370 हा भाजपसाठी आकडा काढला, असे कोणी म्हटले, तर त्यात फारसे गैर मानण्याचे कारण नाही. पण तरीदेखील केवळ काश्मीर मधून 370 कलम हटवले म्हणून भाजपसाठी मोदींनी 370 जागांचा आकडा काढला, हे संपूर्ण सत्य मानणे उथळ ठरेल. कारण त्या पलीकडे जाऊन देखील भाजपसाठी 370 जागांच्या आकड्याला विशेष महत्त्व आहे आणि खरं म्हणजे तेच मोदींच्या कालच्या भाषणातले खरे “राजकीय इंगित” आहे.
काँग्रेसची 350 पार आकडेवारी
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासाचा थोडा धांडोळा घेतला तर 370 या आकड्याचे “राजकीय गौडबंगाल” उलगडू शकते. 1952 ते 1980 या कालावधीत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कायम बहुमत मिळवले. 350 चा आकडा कायम पार केला. पण फक्त एकदाच ते म्हणजे 1962 मध्ये 371 चा आकडा गाठला होता. 1952 मध्ये 364, 1962 मध्ये 371, 1967 मध्ये 283 1971 मध्ये 351 आणि 1980 मध्ये 353 हे काँग्रेसने जिंकलेल्या जागांचे आकडे आहेत. म्हणजे 370 हा आकडा काँग्रेसने फक्त एकदाच गाठला होता, हे या आकड्याचे खरे वैशिष्ट्य आहे.
#WATCH | PM Narendra Modi says, "The third term of our government is not very far now. Only 100-125 days remain to go…I don't go into numbers but I can see the mood of the country. It will make the NDA cross 400 and BJP will definitely get 370 seats…The third term will be… pic.twitter.com/qSuMk8uRXz — ANI (@ANI) February 5, 2024
#WATCH | PM Narendra Modi says, "The third term of our government is not very far now. Only 100-125 days remain to go…I don't go into numbers but I can see the mood of the country. It will make the NDA cross 400 and BJP will definitely get 370 seats…The third term will be… pic.twitter.com/qSuMk8uRXz
— ANI (@ANI) February 5, 2024
अर्थात 1977 आणि 1984 या दोन वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निवडणुकांचे आकडे यामध्ये गृहीत धरलेले नाहीत. कारण 1977 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसला 153 जागांवर समाधान मानावे लागले आणि 1984 च्या निवडणुकीत इंदिरा लाटेत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तब्बल 419 जागा मिळवल्या, पण या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या राजकीय इतिहासात टोकाच्या ठरल्या. कारण 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला होता आणि 1984 च्या निवडणुकीत काँग्रेसने इंदिरा लाटेत प्रचंड मोठे यश मिळवले होते. पण त्यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये म्हणजे 1952, 1962, 1967, 1971 आणि 1980 या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 350 चा आकडा ओलांडला होता. याला अपवाद फक्त 1967 ची निवडणूक ठरली (283).
पण या सर्व निवडणुकांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या निवडणुकांमध्ये 1984 सारखी कोणतीही प्रचंड लाट नव्हती. काँग्रेसने त्या सर्व निवडणुकांमध्ये पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याच प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर आणि काँग्रेसच्या सर्वव्यापी संघटनेच्या आधारावर 350 पारचा आकडा गाठला होता. काँग्रेस त्यावेळी दक्षिण – उत्तर, पूर्व – पश्चिम अशा सर्व भारतभर पसरलेली सर्वांत प्रभावी संघटना होती. सर्व राज्यांमधून काँग्रेसचे खासदार मोठ्या संख्येने निवडून येत होते. एकाच वेळी प्रचंड लोकप्रिय नेतृत्व आणि हाताशी प्रभावी संघटना हे काँग्रेसचे वैशिष्ट्य होते आणि त्या वैशिष्ट्याच्या आधारावरच काँग्रेसने प्रत्येक लोकसभा निवडणूक मध्ये प्रचंड विजय मिळवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे “ते” विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी रिपीट करायचे आहेत
– लोकप्रियतेची बरोबरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा लोकसभेत जाहीर केलेल्या भाजपच्या 370 आकड्याचे हे खरे “राजकीय गौडबंगाल” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेची बरोबरी करून किंबहुना त्या लोकप्रियतेवर मात करून भाजपसाठी 370 जागांचा आकडा खेचून आणायचा आहे, तर आणि तरच मोदी हे खऱ्या अर्थाने पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही लोकप्रियतेत वरचढ आणि कर्तृत्ववान पंतप्रधान ठरतील, याची पक्की जाणीव स्वतः पंतप्रधान मोदींना आणि संघ परिवाराला आहे.
कोणतीही लाट नसताना केवळ मोदींच्या लोकप्रियतेच्या बळावर आणि भाजप संघटनेच्या आधारावर मोदी सरकारला तिसऱ्यांदा जनमताचा कौल मिळवताना 370 हा आकडा गाठायचा आहे. यात मोदींच्या लोकप्रियतेबरोबरच भाजपच्या संघटनेची कसोटी लागणार आहे. 370 आकड्याची कसोटी पार करायची असेल, तर भाजपला संघटनात्मक पातळीवर जुन्या काँग्रेस सारखीच दक्षिण – उत्तर, पूर्व – पश्चिम अशी प्रभावी संघटना निर्माण करून ती कामाला लावावी लागणार आहे. देशातल्या सर्व राज्यांमधून बहुसंख्येने खासदार निवडून आणावे लागणार आहेत. या कसोटीवर मोदींची लोकप्रियता आणि भाजपची संघटना उतरले, तरच भाजप संपूर्ण देशभर व्यापून राहिलेला पक्ष म्हणून जुन्या काँग्रेस सारखा अधिमान्यता पावणार आहे. यासाठी भाजपला गाय पट्ट्यातला पक्ष किंवा उत्तरेतला पक्ष ही ओळख पुसण्याची गरज नसून ती ओळख अधिक ठळक करून पूर्वेकडे आणि दक्षिणेत देखील पसरलेला पक्ष ही ओळख निर्माण करावी लागणार आहे. पूर्वेकडच्या आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये संघटना खोलवर रुजवून आणि जमिनी स्तरावर विस्तार करून भाजपला जुन्या काँग्रेस पक्षाचा राजकीय पर्याय म्हणून ठामपणे उभा राहावे लागणार आहे. मोदींसह संघ परिवाराचे हे खरे राजकीय ध्येय आहे!!
– भाजप 370 आकड्याचे महत्त्व
पूर्वी काँग्रेस समस्त भारतीयांच्या सर्वंकष प्रतिनिधित्वाचा दावा करू शकत असे. त्याला मोठ्या आकड्याचेही दमदार पाठबळ मिळत असे. नेमका तोच दावा मोदी आणि भाजपला करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना 370 या आकड्याचे पाठबळ मिळवायचे आहे, तर आणि तरच संपूर्ण देशभर व्यापलेला पक्ष ही भाजपला ओळख मिळणार आहे. काँग्रेसी विचारसरणीला आणि पक्ष संघटनेला तो खरा धक्का ठरणार आहे!! मोदींना नेमके हेच साध्य करायचे आहे, म्हणूनच 370 या आकड्याचे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्व अनन्य साधारण आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App