विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी संपूर्ण देशात सत्ता असलेल्या कॉँग्रेस पक्षाने पाच राज्यांतील विधानसभेच्या ६९० जागांपैकी फक्त ५५ जागा जिंकता आल्या आहेत. ४०३ जागांच्या उत्तर प्रदेशात तर काँग्रेस जेमतेम दोनच जागा जिंकू शकला. त्यामुळे ज्येष्ठ कॉँग्रेस नेते बंडखोरीच्या मनस्थितीत आहेत.Outstanding performance of National Party! winning only 55 seats out of 690, senior Congress leader in rebellious mood
देशाच्या राजकारणातील काँग्रेसच्या हलाखीच्या अवस्थेविषयी गेल्या दीड वषार्पासून गंभीर चिंता व्यक्त करणारे असंतुष्ट नेते पाच राज्यांतील पराभवानंतर पुन्हा बंडखोरीच्या मन:स्थितीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मा यांच्यासह काही नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या भवितव्याविषयी चर्चा केली.
मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटून किंवा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या दयनीय स्थितीविषयी चर्चा करून काही हशील नाही, असे असंतुष्ट नेत्यांपैकी अनेकांचे मत आहे. काँग्रेस कार्यकारिणीमध्ये आझाद आणि शर्मा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
१३८ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा या गांधी कुटुंबीयांचा बचाव करणेही आता काँग्रेस निष्ठावंतांना जड जात आहे. गांधी कुटुंबाचे दीर्घकाळचे निष्ठावंत माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीही निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोनिया गांधी यांना भेटून निवडणुकीच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. गांधी कुटुंबच आता काँग्रेससाठी अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच ‘एनपीए’ ठरू लागले असल्याचा उपहास राजकीय वतुर्ळात केला जात आहे.
पाच राज्यांतील अवमानकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता बदल अनिवार्य असल्याचे मत पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. काँग्रेसशी सौहार्दाचे संबंध असलेल्या अनेक समविचारी प्रादेशिक पक्षांनी आता काँग्रेसपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला आहे. काँग्रेसने आमच्या पक्षात विलीन व्हावे, असा उपरोधिक सल्ला तृणमूल काँग्रेसने दिला आहे. सततच्या पराभवांमुळे काँग्रेस पक्ष थट्टेचा विषय ठरावा, याचे अनेक काँग्रेसजनांना दु:ख आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App