पाटण्यात दिसली विरोधकांची एकजूट; पंढरपूर, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्यात झाली फाटाफूट!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहारची राजधानी पाटण्यात दिसली विरोधकांची एकजूट, पण पंढरपूर, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकत्यात झाली फाटाफूट अशी तीनच दिवसात अवस्था आली आहे. Opposition unity in patna, but divisions in pandharpur, Delhi, Hyderabad and kolkata

23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. तिथे त्यांनी मोदी विरोधात एकजूट करण्याच्या आणाभाका घेतल्या आणि अवघ्या तीन दिवसात पंढरपूर, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकत्ता इथं याच विरोधकांमध्ये फूट पडली. इतकेच नाही, तर याच विरोधकांनी एकमेकांचे पक्ष फोडले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाशेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पोटनिवडणुकीतले उमेदवार भगीरथ भालके केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने केसीआर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

पण केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात असताना तिकडे तेलंगणात मात्र काँग्रेसने त्यांच्या भारत राष्ट्र समितीत फूट पाडून माजी खासदार आणि माजी मंत्री दिल्लीत आपल्या पक्षात घेतले आहेत. माजी खासदार पोंगुलू, श्रीनिवास रेड्डी आणि माजी मंत्री जूपल्ली कृष्णा राव यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती सोडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राजधानी दिल्लीत काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागली आहे. केजरीवाल यांना काँग्रेसची साथ हवी आहे कारण त्यांना आपला तुरुंगवास चुकवायचा आहे. ते भ्रष्टाचारी आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेस केजरीवालांना साथ देणार नाही, असा स्पष्ट खुलासा अजय माकन यांनी केला आहे.

दिल्लीत हे घडत असताना तिकडे कोलकात्यात ममता बॅनर्जींनी भाजपवर शरसंधान साधतानाच काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या दोन्ही पक्षांना भाजपची बी टीम असल्याचे संबोधले आहे. पश्चिम बंगालमध्ये 20 वर्षांनी पंचायत समितीच्या निवडणुका घेत आहेत. भाजपचे संघटनात्मक बळ पाहून खुद्द ममतांनाच प्रचारात उतरावे लागले आहे. त्यांनी भाजपवर तोफ डागलीच आहे, पण त्याचबरोबर काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे भाजपला आतून मदत करत असल्याचा आरोप करत त्या दोघांनाही दूर लोटण्याची भाषा केली आहे. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर शरसंधान साधले आहे.

पाटण्यात ममता बॅनर्जी यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचूरी हे विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील झाले होते. पण तीनच दिवसांनी ममता आणि येचूरी बंगालमध्ये आमने-सामने आले. तशीच अवस्था केजरीवाल आणि अजय माकन यांची दिल्लीत झाली, तर केसीआर यांची भारत राष्ट्र समिती काँग्रेसने फोडली आणि केसीआर यांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी फोडली. विरोधी ऐक्याची पाटण्यात बैठक झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात हे घडले. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल – मे 2024 मध्ये अपेक्षित आहेत. तोपर्यंत विरोधकांची एकजूट किती टिकते आणि त्यात किती फाटाफूट होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Opposition unity in patna, but divisions in pandharpur, Delhi, Hyderabad and kolkata

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात