नाशिक : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने काँग्रेस सह सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना सन्मानाने दिले, पण हे निमंत्रण स्वतःहून धुडकावून विरोधकांनी राम मंदिराचा कार्यक्रम स्वतःहून आयता संघ आणि भाजपच्या हातात दिल्याचे दिसून आले.
श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
परंतु, हा कार्यक्रम कोणत्याही एका पक्षाचा अथवा संघटनेचा अथवा ट्रस्टचा नाही, तर तो संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे, हे लक्षात घेऊन राम जन्मभूमी ट्रस्टने कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसच्या संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना सन्मानाने पाठविले आहे.
काँग्रेसने या निमंत्रणाचा स्वीकार करून राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार मानले, पण आपले प्रमुख नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत हे देखील ट्रस्टला कळवून टाकले.
पण त्यापलीकडे जाऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणामूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ट्रस्टचे निमंत्रण धुडकावले आहे. राम जन्मभूमी मंदिरातील कार्यक्रम हा संघ आणि भाजपने “हायजॅक” केला आहे, त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्रस्टला कळवली नाही, तर ती जाहीरपणे घेतली आहे. यातून राम मंदिराला असलेला त्यांचा विरोध उघड दिसून येतोच, पण त्या पलीकडे जाऊन या सगळ्याच नेत्यांनी राम जन्मभूमी मंदिराचा सगळा कार्यक्रम आयता संघ आणि भाजपचा हातात देऊन टाकल्याचे असे दिसून येत आहे.
एकीकडे आपल्याला निमंत्रण दिले नाही, म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट महाराष्ट्रात थयथयाट करत आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष निमंत्रण मिळूनही कार्यक्रमाकडे पाठ फिरवून तो कार्यक्रम आयता संघाने भाजपच्या ताब्यात देऊन टाकत आहेत. यातून त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा स्तर किती खाली घसरला आहे हे लक्षात येते.
प्रणव मुखर्जींची मुत्सद्देगिरी
या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची एक राजकीय चाल आठवते. प्रणव मुखर्जींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर मुख्यालयात दसरा कार्यक्रमासाठी बोलावले होते. प्रणव मुखर्जी त्या कार्यक्रमाला गेले. त्यांनी संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मभूमीला देखील भेट दिली. पण प्रत्यक्ष संघ भूमीवर भाषण करताना त्यांनी संविधान, संविधानातले स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि नेहरू प्रणित संसदीय लोकशाही यावरच भर देऊन भाषण केले. संघ संस्थापकांना आपण श्रद्धांजली वाहिली खरी, पण म्हणून आपण संघाचे तत्त्वज्ञान स्वीकारलेच, असे अजिबात नाही, असे प्रणव मुखर्जींनी सूचकपणे पण ठामपणे दाखवून दिले होते.
या मुत्सद्देगिरीचा सध्याच्या काँग्रेस आणि डाव्या नेत्यांमध्ये किंवा बाकीच्या विरोधी पक्ष नेत्यांमध्ये लवलेशही दिसत नाही.
वास्तविक राम जन्मभूमी ट्रस्ट हा मोदी सरकारने स्वतःहून तयार केलेला नसून सुप्रीम कोर्टाने आदेश काढल्यामुळे तयार करावा लागला आहे. त्यामुळे त्याचे अस्तित्वच मूळात स्वतंत्र आहे, मग भले त्यात संघ आणि भाजप प्रणित कार्यकर्तेच विश्वस्त म्हणून असतील तरी देखील ट्रस्टने दिलेले निमंत्रण स्वीकारून वर उल्लेख केलेले सगळे विरोधी पक्ष नेते राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाला गेले असते, तर हा कार्यक्रम फक्त भाजप किंवा संघाचा नाही, हे त्यांना जाहीरपणे सांगता आले असते. भगवान राम सर्वांचे आहेत. महात्मा गांधींच्या उपासनेत रामाला महत्त्व होते. याची महती काँग्रेसच्या नेत्यांना गाता आली असती.
एरवी टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून काँग्रेसचे छोटे-मोठे प्रवक्ते महात्मा गांधी आणि राम याच्यावर दीड दोन मिनिटांची प्रवचने देतच असतात, प्रत्यक्षात रामजन्मभूमीच्या कार्यक्रमाला हजर राहून सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी या नेत्यांना उघडपणे राम आणि महात्मा गांधी यांचा संबंध विशेषत्वाने अधोरेखित करता आला असता पण कार्यक्रमाला जायचे टाळून या नेत्यांनी ही संधी गमावली आहे. प्रणव मुखर्जींकडून कोणतीच मुत्सद्देगिरी शिकली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App