कसेही करून महाविकास आघाडीत एन्ट्री करू पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काल महाराष्ट्रात एक “पराक्रम” करून दाखवला, तो “पराक्रम” साधासुधा नाही, तर थेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने बारामतीकरांच्या महाविकास आघाडीला बाराचा फॉर्म्युला देण्याची हिंमत दाखविली आहे!! एरवी बाराचा फॉर्म्युला निदान महाराष्ट्रात तरी बारामतीकरांची राजकीय मिरास मानली जाते. पण थेट बारामतीकरांनाच नव्हे, तर बारामतीकरांनी निर्माण केलेल्या महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाला प्रकाश आंबेडकरांनी बाराचा फॉर्म्युला देऊन चकित केले आहे!! Prakash ambedkar gives formula of 12 seats each in MVA including VBA
महाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घ्यावे आणि महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीतल्या ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या 4 घटक पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात आणि मोदींच्या भाजपचा पराभव करावा, असा हा फॉर्म्युला आहे. भारताच्या राजकीय इतिहासात जागावाटपे अनेक झाली पण केवळ पराभवासाठी इतके समसमान जागावाटप कोणीच केले नव्हते, ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने करून दाखविले आहे!!
उलट जागा वाटपातली घासाघिस हे तर खरे महाराष्ट्रातलेच काय, पण देशातलेही वैशिष्ट्य राहिले आहे. 200 ते 500 जागा लढवायच्या आणि एखाद दुसऱ्या जागेसाठी युती आणि आघाडी तोडायची हा देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचा विशेषतः काँग्रेस आणि भाजपचा डाव्या हाताचा खेळ राहिला आहे. पण हा खेळ करणारे काही झाले तरी काँग्रेस आणि भाजप हे बडे पक्ष आहेत. कधीकाळी काँग्रेसने या देशावर अनिर्बंध सत्ता गाजवून दाखविली आहे आणि आज भाजप सत्ता गाजवतो आहे. पण त्यांचीही त्या पक्षाच्या नेत्यांची ही कोणाला जागा वाटपाचा बाराचा फॉर्म्युला देण्याची हिंमत झाली नव्हती, ती हिंमत प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र पुरती करून दाखविली याची ऐतिहासिक नोंद, तर केलीच पाहिजे.
तसेही प्रकाश आंबेडकर आणि बारामतीकरांचे 1998 च्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर अही – नकुल असेच नाते राहिले आहे. प्रकाश आंबेडकरांचे आणि शरद पवारांचे राजकीय दृष्ट्या कधीच पटले नाही, पण आता जेव्हा प्रकाश आंबेडकर स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न करत आहेत, त्यावेळी ते रोज महाविकास आघाडीला नवे नवे फॉर्म्युले देत आहेत. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चाचपणी करूनही बघितली पण ती तितकीशी “फिट्टा” बसेल असे न वाटल्याने त्यांनी महाविकास आघाडीची कास धरण्याचा प्रयत्न चालविला आहे पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना अजूनही कुंपणावरच ठेवले आहे.
आता हे कुंपण ओलांडून प्रकाश आंबेडकर ना भाजपकडे जाऊ शकत आणि ना महाविकास आघाडीत येऊ शकत अशी आजची त्यांची अवस्था आहे, म्हणूनच त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला स्वतःहून महाविकास आघाडी समोर ठेवला आहे. पण हा बाराचा जागावाटप फॉर्म्युला असल्याने तो इतक्या सहजासहजी महाविकास आघाडीतल्या कसलेल्या नेत्यांच्या पचनी पडणे अवघड आहे.
शरद पवार काय किंवा काँग्रेस काय यांनी कधीही इतक्या कमी जागा महाराष्ट्रात लढवलेल्या नाहीत. किंबहुना पवारांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगात म्हणजेच 3 पक्षांच्या प्रयोगातही कधी जागावाटप केलेले नाही. त्यामुळे मुळात 3 पक्षांना जागा वाटपात अपेक्षेपेक्षा कमी जागा येणार आहेत. त्यातही प्रकाश आंबेडकरांचा बाराचा फॉर्म्युला तर महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाचा राजकीय गळाच घोटणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात फायदा आहे, तो प्रकाश आंबेडकरांचाच आहे. कारण प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची एकूण राजकीय कपॅसिटी बघता ते काही ठिकाणी उमेदवार पाडू शकतात एवढीच राहिली आहे. त्यापलीकडे वंचित आघाडीची राजकीय कॅपॅसिटीच नाही, पण तरीदेखील मोदींच्यासारखा मोठा चेहरा समोर असल्यामुळे त्याचा पराभव करण्याची करण्याचे लॉलीपॉप देऊन आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या गळ्यात बाराच्या फॉर्म्युलाची घंटा बांधायचे ठरवलेले दिसते!!
आता या बाराच्या फॉर्मुल्याचे महाविकास आघाडीचे नेते बारा वाजवतील की आणखी किती वाजवतील, हा भाग अलहिदा, पण त्याही पलीकडे जाऊन हा बाराचा फॉर्म्युला थेट बारामतीकरांनी बनवलेल्या महाविकास आघाडीला देण्याची हिंमत प्रकाश आंबेडकरांनी दाखविली, याची ऐतिहासिक नोंद, तर करावीच लागेल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App