वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नेटफ्लिक्सने ( Netflix ) मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी IC 814 – द कंधार हाईजॅक या वादग्रस्त मालिकेत बदल केले. आता अपहरणकर्त्यांची खरी आणि सांकेतिक नावे मालिकेच्या सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्येच दिसतील. वास्तविक, IC 814- द कंधार हाईजॅक मध्ये दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे. यानंतर नेटफ्लिक्सच्या इंडिया कंटेंट हेड मोनिका शेरगिल आज मंत्रालयात पोहोचल्या.
मालिकेत दहशतवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’
या मालिकेत, इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करणारे दहशतवादी संपूर्ण घटनेत खऱ्या नावांऐवजी बर्गर, चीफ, शंकर आणि भोला अशी सांकेतिक नावे वापरताना दिसले. सोशल मीडियावर लोकांनी ‘IC 814’ मधील अपहरणकर्त्यांच्या हिंदू नावांवर आक्षेप घेतला. दहशतवाद्यांची खरी नावे लपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला. IC 814 मालिका 29 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.
नेटफ्लिक्सने म्हटले- आम्ही जी नावे होती, तीच दाखवली
नेटफ्लिक्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही ओपनिंग डिस्क्लेमरमध्ये अपहरणकर्त्यांची खरी आणि कोड नावे मालिकेत समाविष्ट करू’. सध्या मालिकेतील सांकेतिक नावे ही वास्तविक घटनेच्या वेळी वापरलेली नावे आहेत. आम्ही प्रत्येक कथेचे मूळ प्रतिनिधित्व करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
मंत्रालयाने म्हटले होते की, ‘भारतीयांच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही
मंत्रालयाने 2 सप्टेंबर रोजी सांगितले की, ‘देशातील लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही. भारताच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आदर नेहमीच सर्वोपरि आहे. काहीही चुकीचे दाखवण्यापूर्वी विचार करायला हवा. याबाबत सरकार अत्यंत कडक आहे.
उच्च न्यायालयात बंदी याचिका
सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिकाद्वारे ‘IC 814: The Kandahar Hijack’ OTT मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. याचिकाकर्त्याने चित्रपट निर्मात्यावर वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
दहशतवाद्यांची हिंदू नावे
सुरजीत सिंह म्हणाले की, मालिकेत दहशतवाद्यांची हिंदू नावे दाखवण्यात आली आहेत, ज्यात भगवान शिव, ‘भोला’ आणि ‘शंकर’ या नावांचा समावेश आहे, तर त्यांची खरी नावे काही वेगळीच आहेत. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे याचिकेत म्हटले आहे. अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर, सनी अहमद, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी आहेत, मात्र वेब सीरिजमध्ये त्यांची नावे बदलून भोला, शंकर, चीफ, डॉक्टर आणि बर्गर अशी ठेवण्यात आली आहेत.
भाजप म्हणाला- चुकीचे काम लपवण्याचा डाव्यांचा अजेंडा
मालिका रिलीज झाल्यानंतर, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अलीकडेच तिच्या सामग्रीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आपली चूक लपवण्यासाठी डाव्या विचारसरणीची मदत घेतली. IC 814 चे अपहरणकर्ते भयंकर दहशतवादी होते. आपली मुस्लिम ओळख लपवण्यासाठी त्यांनी काल्पनिक नावे धारण केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App