एनडीआरएफ, लष्कर आणि इतर यंत्रणा मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेलंगणा (Telangana )आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले आहे.
रस्ते आणि रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि ट्रॅक खराब झाल्यामुळे ४३२ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर १३९ रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
एनडीआरएफ, लष्कर आणि इतर यंत्रणा मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे तेलंगणात १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला. दीड लाखांहून अधिक एकरातील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे आणि केंद्राकडून २ हजार कोटी रुपयांची तत्काळ मदत मागितली आहे. तसेच पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशातही सुमारे साडेचार लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावित भागांना भेटी देऊन पूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वंकष अहवाल राज्य सरकार केंद्राला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खम्मम जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तीन दशकांनंतर येथे असा पूर आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App