विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक करण्यात आली आहे. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार असून गेल्या २९ वर्षांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्याच्याविरुद्ध १९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.Mumbai blasts accused most Wanted militant Abu Bakar arrested
अबू बकर याला याआधी २०१९मध्येही अटक करण्यात आली होती. त्यावेळी काही दस्तावेजांच्या त्रुटीमुळे त्याची यूएईत सुटका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या इनपुट्सच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याला भारताच्या हवाली केले जाईल.
अबू बकर याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असून तो दाऊदच्या अगदी जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद आणि मुस्तफा डोसा या दोघांसोबत तस्करीत अबू बकरही सहभागी होता. आखाती देशांतून सोने, कपडे, इलेक्टॉनिक्सची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. हा माल मुंबई व अन्यत्र लँडिंग पॉइंटपर्यंत पोहचवण्यासाठी या तिघांचे नेटवर्क काम करायचे.
अबू बकरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण तसेच स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथे त्याचे वास्तव्य राहिलेले आहे.अबू बकर हा मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपींपैकी एक आहे. बॉम्बस्फोटानंतर तो देशातून पसार झाला होता.
गेल्या २९ वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. १९९७मध्ये त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली गेली होती. मात्र तो हाती लागला नव्हता. २०१९ मध्ये त्याला यूएईत अटक झाली पण तेव्हाही त्याचे प्रत्यार्पण होऊ शकले नाही. आता मात्र ही प्रक्रिया सुरू झाली असून तो लवकरच भारताच्या ताब्यात असेल, असा विश्वास भारताच्या केंद्रीय यंत्रणा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, १९९३मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. मुंबईत वेगवेगळ्या १२ ठिकाणी स्फोट घडवण्यात आले होते. त्यात २५७ जणांचा बळी गेला होता तर ७१३ जण जखमी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App