INDI आघाडीची कालची दिल्लीतली चौथी बैठक बारकाईने पाहिली, तर लेखाला दिलेल्या शीर्षकाची सार्थकता पटेल. कारण खरंच ममतांनी केला इंदिरा खेला; INDI आघाडीच्या हास्य जत्रेत राहुल गांधींचा “गौरव मोरे” झाला असेच म्हणावे लागेल!! Mamata proposed mallikarjun khrge’s name for prime ministership and sidelined rahul gandhi in INDI alliance!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी INDI आघाडीच्या पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवून काँग्रेसमध्ये मोठा “राजकीय अणूस्फोट” केला. आता ममतांसारख्या सर्वांत प्रबळ प्रादेशिक नेतृत्वाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले म्हटल्यानंतर बाकीच्या प्रादेशिक पक्षांचे नेत्यांचे “पापड” मोडले हे खरेच, पण त्याही पलीकडे जाऊन राहुल गांधींसारख्या नेत्याला प्रादेशिक पक्ष विचारणार नाहीत. उलट त्यांचे नाव काँग्रेस मधून समोर यायला नको म्हणूनच मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि दलित नेत्याचे नाव पुढे करण्याचा डाव ममता बॅनर्जी खेळल्या, हे स्पष्ट झाले.
पण त्यामुळेच महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत गौरव मोरेचा जसा “अपमान” झाल्याशिवाय मजा येत नाही, तशी मजा INDI आघाडीतल्या बैठकीत राहुल गांधींचे नाव न घेता दुसऱ्या कोणाचे नाव पुढे करण्याशिवाय येत नाही हे सिद्ध झाले.
INDI आघाडीसाठी राहुल गांधी हवेत आणि नकोत असे दोन्ही आहेत. कारण काँग्रेस एकतर राहुल गांधींच्या नेतृत्वाची गाडी साईडिंगला टाकू शकत नाही आणि काँग्रेस शिवाय INDI नावाच्या आघाडीला काही राजकीय अर्थ उरत नाही. अर्थात जशी महाराष्ट्राची हास्य जत्रा केवळ काही गौरव मोरेवर अवलंबून नाही, तिथे प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, नम्रता संभेराव यांच्यासारखे गुणी कलावंत आहेत, तसेच “गुणी राजकीय कलावंत” स्वतः ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, नितीश कुमार यांच्या रूपाने INDI आघाडीत अस्तित्वात आहेतच, पण जशी गौरव मोरेचा “अपमान” झाल्याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा पूर्ण होऊ शकत नाही, तशीच अवस्था INDI आघाडीच्या हास्य जत्रेची आहे. राहुल गांधींच्या नावाला प्रादेशिक नेत्यांनी उघडपणे किंवा सूचकपणे विरोध करून बाजूला टाकल्याशिवाय म्हणजेच राहुल गांधींचा “गौरव मोरे” केल्याशिवाय INDI आघाडीत प्रादेशिक नेत्यांचे महत्त्व टिकून किंवा वाढून राहू शकत नाही!!
ममतांचा “इंदिरा खेला!!”
त्या पलीकडे जाऊन खरंच ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधींच्याच पावलावर पाऊल टाकून मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या दलित नेत्याचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले आहे. अर्थातच काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जींनी काँग्रेस मधल्या नेत्याचे नाव पुढे केल्याने आपोआपच खर्गेंचे नाव मागे पडेल, हा ममतांचा राजकीय होरा आहे आणि प्रादेशिक पक्षांमधील सर्वांत अनुभवी आणि प्रबळ नेता म्हणून आपले नाव पुढे रेटता येऊ शकेल, असाही त्यामागे सुप्त होरा आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवालांनी लगेच ममतांनी प्रस्तावित केलेल्या नावाला होकार भरला, तरी अखिलेश यादव आणि नितेश कुमार गप्प बसले. शरद पवारही काही बोलले नाहीत.
पण शरद पवारांना कोणी विचारले नाही आणि त्यांचे नावही कोणी घेतले नाही!! त्यामुळे त्यांचा INDI आघाडीतला “गौरव मोरे” किंवा अन्य कोणी कलावंत झाला नाही!! पण “भल्याभल्यांना” “सरळ” करण्याची पवारांची क्षमता ओळखून INDI आघाडीतले सगळे नेते काल आपापल्या खुर्च्यांवर स्वतःहूनच “सरळ” बसल्याचे दिसले!!
खर्गेंचे “जगजीवन राम” केले
पण काल मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवून ममता बॅनर्जींनी जी राजकीय खेळी केली, तशीच इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अशीच खेळी खेळली होती. त्यांनी जगजीवन राम यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवून आपल्या पंतप्रधानपदातील राजकीय अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला होता. महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एका दलित व्यक्तीला राष्ट्रपतीपदी नेमले, तर गांधीजींना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते 1969 मध्ये म्हणाल्या होत्या. पण काँग्रेस मधल्या त्या वेळच्या सगळ्या बुजुर्ग नेत्यांनी जगजीवन राम यांच्यासारखा हेवीवेट नेता पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला करणे टाळले. त्यात बुजुर्ग नेते यशस्वी झाले पण जगजीवन राम यांचे राष्ट्रपती पद आणि नंतर पंतप्रधान पद कायमचे हुकले.
ममता बॅनर्जी या इंदिरा गांधींनी इतक्या मुरब्बी आणि मुत्सद्दी नसल्या, तरी त्या काँग्रेसी राजकारणात लोणच्यासारख्या मुरल्या आहेत. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींसारखीच एक खेळी करून मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या दलित नेत्याचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले असेल, तर त्यात फारसे वेगळे मानायचे कारण नाही.
– इतरांच्याही महत्त्वाकांक्षांना सुरुंग
उलट आघाडीच्या राजकारणात जे नाव पंतप्रधानाचा मुख्यमंत्री पदासाठी पहिल्यांदा येते ते लगेच कट होते. दुसऱ्या – तिसऱ्या नावाचाही विचार होत नाही. चौथ्या नावाचा विचार होतो, हे देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या पंतप्रधान बनण्यावरून आधीच सिद्ध झाले होते. त्यामुळे ममतांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव समोर करून समोर आणून खुद्द त्यांचा पत्ता तर कट केलाच, पण इतरांच्याही महत्त्वाकांक्षांना सुरुंग लावण्याची तयारी करून ठेवली, हे खरे कालच्या INDI आघाडीच्या बैठकीचे राजकीय रहस्य आहे. पण या सगळ्यात INDI आघाडीच्या हास्य जत्रेत राहुल गांधींचा “गौरव मोरे” होऊन गेला, हे मात्र निश्चित!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App