विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळून तिची धग मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata banerji ) यांच्या खुर्चीला लागल्यानंतर ममता बॅनर्जी खुर्ची सोडायला तयार झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी बोलावून सुद्धा डॉक्टर चर्चेला आले नाहीत म्हणून संतापून त्यांनी खुर्ची सोडण्याचे वक्तव्य केले की सिरीयस ऑफर दिली??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे
कोलकत्ता बलात्कार प्रकरणाचे राजकीय वादळ बंगाल आणि देशभरात घोंगावत आहे. अशाततच पीडितेच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठं आंदोलन उभारून पश्चिम बंगाल सरकारला घेरलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून योग्य सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण दाबण्याकरता पीडितेच्या कुटुंबाला व इतरांना पैशांचं आमिष दाखवल्याचाही आरोप होत आहे.
दरम्यान, आंदोलक डॉक्टरांची भेट घ्यायला गेलेल्या ममता बॅनर्जी यांना कोणीही भेटायला आलं नाही. बॅनर्जी तब्बल दोन तास पीडितेचं कुटुंब, नातेवाईक व आंदोलक डॉक्टरांची वाट पाहत होत्या. परंतु, त्यांच्यासमोर रिकाम्या खुर्च्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हतं. बराच वेळ वाट पाहून त्या निघून गेल्या.
ममता बॅनर्जी सरकारने आंदोलक डॉक्टरांना तिसऱ्यांदा बैठकीसाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी नबन्नाच्या सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र डॉक्टरांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलंच नाही. या चर्चेचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. परंतु, ही मागणी ममता बॅनर्जी यांनी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सभागृहातून बाहेर पडताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, न्यायासाठी मी माझी खुर्ची सोडण्यास तयार आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलवून देखील डॉक्टर चर्चेला आले नाहीत त्यामुळे त्यांनी संतापून खुर्ची सोडण्याची तयारी दाखविली की सिरीयस ऑफर देऊन वाद शमवायचा प्रयत्न केला??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण ममता बॅनर्जींनी राजीनामे अशी नौटंकी अनेकदा केली आहे, पण प्रत्यक्षात तो खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या खुर्ची सोडण्याच्या तयारीवर राजकीय वर्तुळात दाट शंका आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more