वृत्तसंस्था
वॉर्सा : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क गुरुवारी म्हणाले, युक्रेन युद्ध लवकर संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मोदींनी युद्धाच्या शांततापूर्ण शेवटासाठी वैयक्तिक आश्वासन दिले आहे. या वेळी मोदी म्हणाले, हा युद्धांचा काळ नाही. युद्धात निरपराधांचा मृत्यू हे मानवतेसाठी मोठे आव्हान आहे. कोणतीही समस्या युद्धभूमीवर सोडवली जाऊ शकत नाही, यावर भारताचा ठाम विश्वास आहे.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला भारतीय विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’मध्ये पोलंडच्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आभार मानले. त्यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी जामासाहेब यूथ एक्स्चेंज प्रोग्रामचीही घोषणा केली. पोलंडहून पंतप्रधान मोदी शुक्रवारी रेल्वे फोर्स वन ट्रेनने युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचतील. युक्रेनमध्ये सात तासांच्या वास्तव्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. १९९१ मध्ये युक्रेन स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आल्यानंतर या देशाचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
भारत सर्वात आधी मदतीचा हात पुढे करतो : मोदी
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी रात्री भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना सांगितले की, कोणत्याही देशावर संकट आले की मदतीचा हात पुढे करणारा भारत सर्वात पुढे असतो. ते म्हणाले, अनेक दशकांपासून भारताचे धोरण सर्व देशांपासून अंतर राखण्याचे होते. मात्र, आज भारताचे धोरण सर्व देशांच्या जवळ राहण्याचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App