वृत्तसंस्था
मुंबई : EVM battery विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मिळालेल्या राक्षसी बहुमतावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंबंधी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मतदानानंतरही ईव्हीएमची बॅटरी 99 टक्के चार्ज कशी? असा कळीचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमच वस्तूस्थितीदर्शक खुलासा केला आहे.EVM battery
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅकची स्थिती 99 टक्के दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172- अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत या मतदारसंघातील काही ईव्हीएम पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली होती. याविषयी एका उमेदवाराने आक्षेप नोंदवला होता.
गैरसमज पसरवणे पूर्णतः अयोग्य
आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पत्रानुसार, EVM पॉवर पॅकमध्ये 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्याची रचना आहे. क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते. परंतु बॅटरीची क्षमता ‘थ्रेशोल्ड’च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदवली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपूट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे बॅटरी चार्जिंग 99% दर्शवली जाऊ शकते. ही एक सर्वसामान्य स्थिती आहे. त्यामुळे याविषयीचा आक्षेप अयोग्य आहे. तसेच, अशाप्रकारे गैरसमज पसरवणेही अयोग्य आहे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
स्वरा भास्कर यांनी उपस्थित केला होता सवाल
उल्लेखनीय बाब म्हणजे अणुशक्तीनगर मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती तथा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद हे मैदानात होते. त्यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांनी पराभव केला. या पराभवानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. दिवसभर मतदान केलेल्या मशीनमध्ये 99% चार्ज झालेली बॅटरी कशी असू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App