जीवनव्रती विनायकराव थोरात यांचा अमृतमहोत्सवी सोहळा
विशेष प्रतिनिधी
चिंचवड : संघ हा विवादाचा विषय नाही. तो वाचून किंवा ऐकून कळत नाही, तर तो संघ जगणाऱ्या विनायकरावांसारख्या असंख्य सेवाव्रती कार्यकर्त्यांकडे बघून कळतो. त्यांचेसारखे कार्यकर्ते तयार करणे हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी उपलब्धी आहे, असे गौरवोद्गगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी काढले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे जेष्ठ कार्यकर्ते विनायकराव थोरात यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, सत्कारमूर्ती विनायकराव थोरात, सौ. कमलताई थोरात उपस्थित होत्या. भैय्याजी जोशी आणि नानासाहेब जाधव यांच्या हस्ते थोरात दांपत्याचा हृद्य सत्कार करण्यात आला.Creating Sevavrat activists like Vinayakrao Thorat is Sangh’s achievement: Bhaiyyaji Joshi
भैय्याजी जोशी म्हणाले, सामाजिक जीवनात कार्य आणि नेतृत्व करताना विनम्रता, उच्च विचार आचरण, सर्वांना बरोबर घेऊन चालणे हे सर्व गुण असावे लागतात ते विनायकरावांकडे आहेत. आता देश बदलतोय ही जी अनुभूती सर्वांना येते आहे, यासाठी ज्यांनी आपले योगदान दिले, भूमिका निभावली अशांचे प्रतिनिधी विनायकराव आहेत. त्यांच्या मैत्रीला कुठलेही कुंपण नसून विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, या पद्यांच्या ओवी प्रमाणे ही यथार्थ आणि प्रेरणादायी जीवने असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. २२ जानेवारी अयोध्येत झालेला सोहळा हे सुवर्ण पान असून या संघर्षात देखील विनायकराव होते, हा गौरवोल्लेख करून त्यांनी आता काशी, मथुरा येथील ही भव्य मंदिरे बघावी या शुभेच्छा देऊन स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात विनायकरावांचा पण अमृतमहोत्सवी कार्यक्रम हे अहोभाग्य असल्याचे सांगितले.
त्याआधी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी विनायकरावांच्या समर्पण, संयमी स्वभाव, कामाचा आवाका त्यासाठी प्रचंड प्रवास, कधीही कामाचे श्रेय न घेता शांतपणे संघाचे काम जबाबदारीने करीत ते सर्वांसाठी आदर्श असल्याचे नमूद केले.
आपल्या मनोगतात विनायकरावांनी संघामुळे असंख्य आदर्श व्यक्तिमत्वे घडतात, संघात अनेक जिवंत आदर्श असल्याचे सांगून अनेक मार्गदर्शक प्रचारक, कार्यकर्त्यांचा आवर्जून उल्लेख केला, त्यांच्या कार्यात सौभाग्यवती सौ. कमलताईंची लाखमोलाची साथ लाभल्याचे सांगितले.
या कार्यक्रमापूर्वी दुपारी थोरात यांच्या आकुर्डी प्राधिकरणस्थित निवासस्थानी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील विनायकराव थोरात यांची कौटुंबिक भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
अमोल थोरात यांनी प्रास्ताविक करून आभार यांनी मानले. या प्रसंगी विविध सेवा संस्थांना थोरात कुटुंबियांतर्फे मंगलनिधी सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाला थोरात कुटुंबीय, आप्तेष्ट, स्वयंसेवक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पसायदानाने सांगता झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App