विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा अखेरच्या टप्प्यात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशभरातल्या 21 राजकीय पक्षांच्या नेत्यांना खास पत्र पाठवून जम्मू – काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. Congress invited 21 political parties to Bharat Jodo Yatra, but dropped at least 7 parties, how will opposition unity come into existence?
काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी होणारा हा विरोधी ऐक्याचा प्रयत्न आहे. पण काँग्रेसची ही विरोधकांची एकी आहे की बेकी??, हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कारण काँग्रेसने ज्यावेळी 21 पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून आपल्याबरोबर घेण्याचे निश्चित केले आहे, त्याच वेळी काँग्रेसने काही मोजक्या पक्षांना यातून वगळले देखील आहे आणि म्हणूनच काँग्रेस विरोधकांची एकी साधू इच्छिते का बेकी??, हा प्रश्न पडला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवले आहे, त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष, मायावतींचा बसप, झारखंड मुक्ती मोर्चा, लालूंचा राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल, दोन्ही डावे पक्ष, आंध्र प्रदेशातील तेलगू देशम, जम्मू काश्मीर मधील फारूक अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, जनता दल सेक्युलर, तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम, मरूमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम यांचा समावेश आहे.
पण काँग्रेसने ज्यांना वगळले आहे, त्या पक्षांमध्ये मात्र आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती, उडीसातील बिजू जनता दल, तमिळनाडू अण्णा द्रमूकचे दोन गट, जम्मू काश्मीर गुलाम नबी आझादांची डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी, आसाममधला बद्रुद्दीन अजमलांचा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांचा समावेश आहे.
याचा अर्थ काँग्रेस जरी 21 पक्षांसह विरोधी पक्षांची एकी साधू इच्छित असली तरी वर उल्लेख केलेल्या पक्षांना वगळून काँग्रेसने राजकीय बेकी देखील साधल्याचे दिसत आहे. त्यासाठी काँग्रेसची काही राजकीय लॉजिकल कारणे जरूर आहेत. पण तरी बेकीचा परिणाम मात्र चुकलेला नाही. याचे कारण लोकसभेच्या तिथल्या जागांच्या संख्येत दडले आहे.
लोकसभेच्या जागांचा हिशेब लक्षात घेतला तर तामिळनाडू सोडून आंध्र, तेलंगणा, आसाम, जम्मू काश्मीर आणि ओडिसा या 5 राज्यांच्या मिळून 82 जागा आहेत आणि त्यात तामिळनाडू ऍड केला तर 39 जागा वाढून 121 वर पोहोचतात. याचा अर्थ असा की काँग्रेसला 121 जागांवर विरोधकांचे ऐक्य नको आहे. काँग्रेसला या राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षांशी लढत देणे, भाजपशी लढत देण्यापेक्षा प्राधान्यक्रमाचे वाटते. म्हणजे मूळातच काँग्रेसला देश पातळीवर भाजपची टक्कर घेताना 121 जागांची खोट बसणार आहे. याचा आणखी एक अर्थ असा की 542 – 121 = 421 जागांवर काँग्रेस विरोधकांची एकी करू इच्छित आहे.
… आणि इथेच लोकसभेच्या फार महत्त्वाच्या निवडणूक गणिताचा आकडा दडला आहे. 2024 मध्ये भाजपने कधीच न जिंकलेल्या 144 जागांवर आपले लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचे ठरवले आहे. किंबहुना कॉन्सन्ट्रेट केले आहे. दक्षिणेतील ही राज्ये आहेत. विरोधी एकीतून वगळून काँग्रेस ज्या प्रादेशिक पक्षांची लढू इच्छित आहे, त्याच प्रादेशिक पक्षांशी भाजपचीही लढत आहे. अशा वेळी लार्जर इंटरेस्ट लक्षात घेऊन काँग्रेसने त्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेणे अपेक्षित आहे. पण काँग्रेसने तशी मानसिकता दाखवलेली नाही. हा काँग्रेससाठी मोठा अयब आहे.
आंध्र, उडीसा, आसाम, तेलंगण मध्ये या प्रादेशिक पक्षांना भाजपशी टक्कर घ्यायला काँग्रेस एकाकी टाकणार आहे… मग यामध्ये नेमका फायदा कोणाचा होईल?? हे सांगण्यासाठी फार मोठा राजकीय अभ्यास करण्याची गरज नाही. म्हणूनच वर शीर्षकात विचारलेला प्रश्न योग्य ठरतो… 21 पक्षांना पत्र पाठवून काँग्रेस विरोधकांची एकी साधतेय की बेकी…??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App