वृत्तसंस्था
हिसार : हरियाणा काँग्रेसने शुक्रवारी रात्री उशिरा 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह 28 आमदारांवर पक्षाने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, दुपारी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या माजी कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) यांना जुलाना येथून तिकीट देण्यात आले आहे. तुरुंगात असलेले सोनीपतचे आमदार सुरेंद्र पनवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत 67 उमेदवारांची नावे होती. राज्यात 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.
काय आहे पहिल्या यादीत…
काँग्रेसने ईडी प्रकरणात अडकलेल्या तीन आमदारांना तिकीट दिले आहे. यामध्ये सोनीपतमधील सुरेंद्र पनवार, समलखा येथील धरमसिंह छौक्कर आणि महेंद्रगडमधील राव दान सिंह यांचा समावेश आहे.
पहिल्या यादीत 3 मुस्लिम चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये ममन खान, महंमद इलियास, आफताब अहमद यांचा समावेश आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या चौधरी उदयभान या एकमेव नेत्याला तिकीट देण्यात आले. चौधरी उदयभान सध्या हरियाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या जवळचे आहेत. उदयभान यांना 2019 मध्ये भाजपचे जगदीश नय्यर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपने आपल्या पहिल्या यादीत जगदीश नय्यर यांना तिकीट जाहीर केले नाही आणि त्यांचे तिकीट रोखून ठेवले.
सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा यांच्या तीन समर्थकांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये कालका येथील प्रदीप चौधरी, नारायणगड येथील शैली चौधरी आणि सधौरा येथील रेणू बाला यांचा समावेश आहे. तिघेही आमदार आहेत.
5 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये नारायणगड येथील शैली चौधरी, सधौरा येथील रेणू बाला, जुलाना येथील विनेश फोगाट, कलानौर येथील शकुंतला खटक, झज्जर येथील गीता भुक्कल यांचा समावेश आहे.या यादीत विनेश फोगाट आणि शाहबाद मतदारसंघातील रामकरण काला हे दोन नवीन चेहरे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more