विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येत रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी साकार केले. स्वप्नपूर्तीचा हा क्षण साजरा करण्यासाठी आज मुंबईत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. Balasaheb’s dream of Ram temple has been realized by Modi
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाला वंदन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यांना वंदन करून त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत या भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.
ढोल ताशे, लेझीम आणि विविध प्रकारच्या वाद्यांच्या आवाजात आणि जय श्रीरामच्या जयघोषात ही शोभायात्रा शिवाजी पार्क, दादर असे करता करता भोईवाडा येथील श्रीराम मंदिरापर्यंत मार्गस्थ झाली. यावेळी जागोजागी नागरिकांनी हात जोडत, फोटो काढत, नाचत आणि जय श्रीरामचे नारे घुमवत आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. संपूर्ण देशाप्रमाणे मुंबई शहर देखील राममय होऊन आनंदून गेल्याचे यावेळी अनुभवायला मिळाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना भवन येथे येताच ही शोभायात्रा थांबवत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला त्रिवार वंदन केले. यावेळी जे ध्येय घेऊन बाळासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राम मंदिरासाठी संघर्ष उभा केला तो आठवून मनोमन डोळे भरून आले.
यानंतर भोईवाडा येथील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाची विधीवत पूजा करून आरती केली. तसेच तब्बल पाचशे वर्षांनी रामलल्ला आपला वनवास संपवून पुन्हा आपल्या घरात विराजमान झालेत हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे मत नागरिकांशी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, प्रवक्ते किरण पावसकर, सौ.शीतल म्हात्रे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more