विशेष प्रतिनिधी
ढाका : भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत कांस्यपदकाची कमाई केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४-३ ने नमवले . याच स्पर्धेत भारताने साखळी फेरीच्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला होता. Asian Champions Trophy
ढाका येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुमीत, वरुण कुमार आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. पाकिस्तानकडून अरफाज, अब्दुल राणा आणि नदीम या खेळाडूंनी गोल केले.
पहिल्या सत्रापासून भारताने आक्रमक सुरुवात केली. लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत हरमनप्रीतने पहिल्या सत्रात पाकिस्तानला १-० ने पिछाडीवर ढकललं. परंतू यानंतर पाकिस्तानच्या अरफाजने भारताच्या बचावफळीतील गलथान खेळाचा फायदा घेत पाकिस्तानकडूनही गोल केला. यानंतर मध्यांतरापर्यंत गोलपोस्टची कोंडी कायम राहिली.
तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या अब्दुल राणाने एका सुंदर टॅप बॉलवर गोल करत भारताला पिछाडीवर ढकललं. परंतू पाकिस्तानची ही आघाडी कायम राहणार नाही याची काळजी भारताच्या सुमीतने घेतली ३३ व्या मिनीटाला पाकिस्तानने केलेल्या गोलनंतर सुमीतने १२ मिनीटांत भारताचा दुसरा गोल केला. यानंतर भारताकडून वरुण कुमारने ५३ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर तर आकाशदीपने ५७ व्या मिनीटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी ४-२ ने वाढवली.
पाकिस्तानने अखेरच्या सत्रात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. नदीमने सुरेख मैदानी गोल करत पाकिस्तानची पिछाडी कमी केली खरी, परंतू भारतीय खेळाडूंनी यानंतर पाकिस्तानला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App