दुकानांवर मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच, इतर कुणी श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, राज ठाकरेंकडून सरकारचे अभिनंदन आणि इशाराही

ठाकरे मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या मराठी पाट्यांसाठी खूप आधीपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. The credit of Marathi Names on shops belongs only to MNS Says Raj Thackeray


प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या मराठी पाट्यांसाठी खूप आधीपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 09 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.”

आपल्या पत्रात ते पुढे म्हणाले की, यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की, मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका! पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मन:पूर्वक अभिनंदन.

दरम्यान, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. पूर्वीच्या नियमात एक पळवाट मराठी पाट्या डावलल्या जात होत्या. आधी जिथे १० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्यांनाच मराठी पाट्यांचं बंधन होतं. परंतु आता या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून १० पेक्षा कमी असणाऱ्या आस्थापनांमध्येही मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आपल्या आहेत.”

The credit of Marathi Names on shops belongs only to MNS Says Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या