विनायक ढेरे
नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. पण त्यांना हे पद मिळण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणाचा एक महत्त्वाचा धागा गुंतलेला आहे. तो म्हणजे संग्राम थोपटे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. थोपटे – पवार राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पण हा एकच धागा नाही. मुद्दा त्यापेक्षाही पुढचा आहे आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या काँग्रेस संघटनेशी संबंधित आहे. sangram thopate or amin patel??, sharad pawar may intervene in congress selection process for assembly speaker post
गेली कित्येक वर्षे शरद पवारांनी “करेक्ट कार्यक्रम” करून पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपवत आणला आहे. अजित पवारांची त्यांना यासाठी भक्कम साथ मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या फक्त नावाला काँग्रेस पक्ष उरला आहे. यात नाव घेण्यासारखे एकच नेते उरले आहेत त्यांचे नाव अनंतराव थोपटे आहे. पण वयामुळे ते सध्या राजकीयदृष्ट्या सक्रीय नाहीत.
सुरेश कलमाडींचे नेतृत्व पवारांनी नेट लावून व्यवस्थित संपविल्यानंतर पुणे शहरामध्ये काँग्रेसचे एकमुखी आणि भक्कम नेतृत्व पवारांनी उभे राहूच दिले नाही. प्रकाश ढेरे, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर हे काँग्रेसचे प्रभावी आमदार होते. पण त्यांचे नेतृत्व विकसित होऊ देण्यात आले नाही. काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता त्यामुळे शहरात सैरभैर झाला. खरे म्हणजे आजही काँग्रेसच्या एवढ्या गलितगात्र अवस्थेत देखील काँग्रेसचा कार्यकर्ता पुण्यात तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा संख्येने अधिक असेल. पण भक्कम नेतृत्वाअभावी त्याचे अस्तित्व ठळकपणे दिसत नाही.
जी पुणे शहरातली काँग्रेसची स्थिती तीच पुणे जिल्ह्यातली काँग्रेसची स्थिती आहे. संग्राम थोपटे, भोर आणि संजय जगताप, पुरंदर हे दोनच काँग्रेसचे आमदार पुणे जिल्ह्यात आहेत. ते देखील तालुक्यापुरत्या मर्यादित ताकदीवर आधारित आहेत. संजय जगतापांच्या बाबतीत तर पवारांनी टेकू दिल्यामुळेच संजय जगताप निवडून आले आहेत. कारण पवारांना तिथे शिवसेनेच्या विजय शिवतारेंचे नेतृत्व फुलू द्यायचे नाहीए. म्हणून त्यांनी संजय जगतापांना तात्पुरते बळ दिले आहे.
पुणे जिल्ह्यात बाकीच्या ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व तोळामासा उरले आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष देखील संघटनात्मक पातळीवर काँग्रेसच्या पुढे आहेत. अशा स्थितीत संग्राम थोपटेंच्या रूपाने काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील नेत्याला शरद पवार हे विधानसभेचे अध्यक्षपद मिळू देतील, ही शक्यता कमी वाटते. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ५ जुलैला ठरणार आहे. त्यामुळे कोणते ना कोणते कारण काढून पवार हे आपल्या शैलीनुसार काँग्रेसच्या दुसऱ्याच आपल्या सोयीचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी पुढे आणण्याची शक्यता वाटते.
यासाठी अर्थातच राजकीय कारणे आणि तर्क वेगवेगळे दिले जाण्याची शक्यता आहे. “कही पे निगाहे कही पे निशाना” असेच ते असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या अमिन पटेल यांच्या नावाची चर्चा देखील त्याच राजकीय कारणातून पुढे आणण्यात आल्याची शक्यता आहे. पण त्याचे खरे कारण पुणे जिलह्यातल्या नेत्याला विधानसभेचे अध्यक्षपद मिळवून देऊन काँग्रेसच्या पुनरूज्जीवनाची संधी न देणे हे असेल, असे वाटते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App