ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’…या गावरान मराठीतल्या शब्दांनी तयार झालेल्या गाण्यानं गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातला. या गाण्याचे संगीतकार, गायक आणि निर्मात्या या तिघांना या गाण्याने एकदम स्टार बनवले. पण या अफाट लोकप्रियतेमुळेच त्यांच्यात कॉपीराईटचा वाद सुरु झाला आणि…O Sheth, you have made a sound directly
प्रतिनिधी
पुणे ः ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याचे गायक उमेश गवळी, संगीतकार प्रणिकेत खुळे आणि निर्मात्या संध्या केशे हे त्रिकुटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ‘कॉपीराईट’च्या मुद्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकावे लागले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला आहे.
प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी उमेश गवळींना ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याच्या निर्मितीचा व्हिडिओ करण्यास सांगितले. गायक गवळींनी तसा तो केला. त्यात या दोघांचाही सहभाग होता. हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर परत खुणे आणि केशे यांनी गाण्याचा ओरिजनल व्हिडिओ केला. मात्र त्याला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. मग आमचाच व्हिडिओ ओरिजनल आहे असे म्हणत खुणे आणि केशे यांनी गवळींच्या व्हिडिओवर बंदी आणली. मग गायक गवळी यांनीही त्या दोघांचा व्हिडिओ बंद केला. निर्मात्यांनी गायकाला पैसे दिले नव्हते. खुणे आणि केशे यांचा मालकी हक्क असला तरी 50 टक्के रक्कम गायकालाही मिळावी आणि गाण्यावरची बंदी उठवावी यावर तिघांचे एकमत झाले आणि अखेर वाद मिटला, अशी माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.
खुणे, केशे आणि गवळी यांच्यातील कॉपीराईटच्या वादामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. अल्पावधीतच लाखो हिट्स आणि लाईक मिळालेले गाणे यूट्यूबवरुन बंद झाले होते. त्यामुळे केशे आणि खुणे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करुन वाद सोडवला.
उमेश गवळी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आमच्यात संवाद नव्हता. गैरसमजातून आम्ही तिघांनी एकमेकांविषयी चुकीची वक्तव्ये केली. त्यामुळे मराठी रसिकांमध्ये चुकीचा संदेश गेला. आता आम्ही तिघांनी एकत्र येऊन मनसे चित्रपट सेना, चित्रपट महामंडळ यांच्या प्रयत्नांतून हा वाद मिटवला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. यापुढेही आम्ही एकत्रित काम करणार आहोत. ‘मराठी कलाकारांनी एकमेकांचे पाय न ओढता एकत्र राहून अधिक चांगले काम करावे. कलाकारांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राहील,’ असे मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष जयराम लांडगे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App