प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ हे सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेतील 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालय (एनफोर्समेंट डिरेक्टोरेट) अर्थात ईडीने यांना नोटिस बजावल्यावर अडसूळ यांना लगेचच प्रकृतीचा त्रास सुरु झाला. या संदर्भाने भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांना जबरी सल्ला दिला आहे.
सोमय्या म्हणाले, “ईडीकडे तक्रार केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःहून त्यांचा समुद्र किनारी असणारा कोट्यवधी रुपयांचा अनधिकृत बंगला पाडला. खासदार संजय राऊत यांनीही चोरीचे ५५ लाख रुपये बँकेकडे परत जमा केले. अनंत अडसूळ यांनीही नार्वेकर व राऊत यांचा आदर्श घ्यावा. ठेवीदारांचे पैसे परत करुन टाकावेत. मग ईडीच्या कारवाईचा विषयच येणार नाही.” आता घोटाळा बाहेर काढला की दवाखान्यात भरती व्हायची नवीनच पद्धत राज्यात सुरू झाली आहे, असाही टोला सोमय्या यांनी लगावला. कोल्हापुरला निघाले असता सोमवारी (दि. 27) रात्री सोमय्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध तीन घोटाळ्यांची तक्रार देणार आहेत. सोमय्या म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात माझ्या जीविताला धोका असल्याचे सांगून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोल्हापुर जिल्हा प्रवेशबंदी घातली. पण त्याच जिल्हाधिकाऱ्यांनी आज तो आदेश मागे घेतला. यातून ठाकरे सरकारचा खोटेपणा सिद्ध होत आहे. “माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना तुम्ही अटक का केली नाही,” असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.नारायण राणे यांच्या समुद्र किनाऱ्यावरील बंगल्याविरोधात सोमय्या यांनी यापूर्वी तक्रार केली होती. त्याचे आता काय झाले, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सोमय्या म्हणाले, “राणे यांच्या बंगल्यावर परब का कारवाई करत नाहीत? राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग तुम्हाला कारवाई करायला कोणी अडवले?”, असा प्रतिप्रश्न सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App