राष्ट्रवादी काँग्रेसची आली पंचविशी, आता तरी पक्ष गाठणार का आमदारांची पंचाहत्तरी??


राष्ट्रवादी काँग्रेसची आली पंचविशी, आता तरी पक्ष गाठणार का आमदारांची पंचाहत्तरी??, असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या निमित्ताने 9 जून 2023 पासून पक्षाचे अनेक कार्यक्रम सुरू होत आहेत. त्याचा प्रारंभ पक्ष नेतृत्वाने नगर जिल्ह्यातून करायचा ठरवला आहे. अर्थातच त्यामध्ये विशिष्ट स्थानिक राजकीय गणिते आहेतच. NCP@25 : will party succeed in getting 75 miles in maharashtra state assembly??

पण त्या पलीकडे जाऊन एखादा यशस्वी राजकीय पक्ष जेव्हा आपल्या स्थापनेची पंचविशी गाठतो, तेव्हा थोडे मागे वळून पाहण्याची संधी आणि भविष्यवेध घेण्याची गरज असते.

मूळ हेतू केव्हाच संपुष्टात

शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्या उद्देशाने केली, तो सोनिया गांधींच्या परकीयत्वाचा मुद्दा केव्हाच इतिहासजमा झाला आहे आणि संस्थापकांपैकी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर आता मूळातच राष्ट्रवादीत उरलेले नाहीत. संगमा यांचे तर काही वर्षांपूर्वी निधनही झाले. आता उरले ते शरद पवार राष्ट्रवादीच्या कायमस्वरूपी अध्यक्षस्थानी आहेत. त्यामुळे पक्षाचा जो काही राजकीय कर्तृत्वाचा लेखाजोखा आहे, तो एक प्रकारे गेल्या 25 वर्षांचा शरद पवारांचा वैयक्तिक राजकीय लेखाजोखाच आहे.

कायम सत्तेच्या वळचणीच्या शोधात

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अवघ्या दोन महिन्यांत पक्षाला सत्तेवर आणून बसविण्याची “किमया” साधली, खरी पण ती ज्यांच्या विरुद्ध बंड केले त्या सोनिया गांधींशी तडजोड करूनच. शरद पवारांची अशी तडजोड करण्याची क्षमता अफाट आहे. अनेक जण या क्षमतेचे “सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याची धडपड” या शब्दांनी वर्णन करतात. पण काही असले तरी शरद पवार सत्ता आणि सत्तेच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसचे समीकरण जुळवतात ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर बसायला कधी तयारच नसते. कारण पक्षाचा तो डीएनएच नाही. “संघर्ष” हा भाजपचा डीएनए आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. हे खरे मानले, तर सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे हा राष्ट्रवादीचा डीएनए आहे, असे म्हणावे लागेल.

अर्थात राष्ट्रवादीचा हा डीएनए असला तरी राष्ट्रवादी गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्रात आमदारांच्या संख्येची पंचाहत्तरी देखील गाठू शकलेली नाही. 72 हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा सर्वोच्च आकडा आहे.

संपूर्ण देशामधल्या प्रादेशिक पक्षांमध्ये कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असेल, ज्याची विशिष्ट ताकद असूनही कधीही पक्षाचा अद्याप मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. तरी देखील शरद पवार हे विरोधकांच्या आघाडीत राष्ट्रीय पातळीवरचे महत्त्वाचे नेते मानले जातात. हे त्यांचे वैयक्तिक राजकीय कर्तृत्व आहे.

वारस ठरवण्यात अद्याप अपयश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पक्ष संघटनात्मक पातळीवर प्रमुख म्हणून नेमके कुणाला बसवायचे?, याचा विचार करण्यात पक्ष नेतृत्वाला आलेले अपयश हे देखील ठळक आहे.

गेल्याच महिन्यात शरद पवारांच्या विस्तारित आत्मचरित्राचे प्रकाशन मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाले. पण त्या प्रकाशनापेक्षा पवारांचे निवृत्ती नाट्य जास्त गाजले. नेते आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव पवारांनी आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला. पण तो खुंटा हलवून बळकट करण्याचाच प्रकार ठरला. कारण पवारांच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही नेत्याला पक्षाध्यक्षपदी बसवून घेण्याची अथवा सहन करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तयारीच नव्हती. पवार हे पालकत्वाच्या भूमिकेत जाऊन त्यांच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी बसवतील ही शक्यताच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी जसे शिवसेनेतल्या अनेक नेत्यांचा विरोध पत्करून किंवा नाराजी सहन करून उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी एस्टॅब्लिश करून दाखविले, तसे शरद पवार यांना अद्यापही जमलेले नाही.

सुप्रिया सुळे की अजित पवार द्वंद्व कायम

सुप्रिया सुळे की अजित पवार या द्वंद्वातून शरद पवारांनी स्वतःची सुटका करून घेतलेली नाही किंबहुना ते सुटका करवून घेऊ शकलेले नाहीत. भले अजित पवारांनी बंड केले असेल किंवा भविष्यकाळात ते बंड करतीलही, पण शरद पवारांना ठामपणे आपल्या मनातले सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च पदावर अद्याप तरी बसवता आलेले नाही.

अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा पंचविशी गाठते आहे, तेव्हा पक्षाच्या अनेक नेत्यांची महत्त्वाकांक्षा तर थेट मुख्यमंत्री पदाची आहे. यासाठी अनेकांची पोस्टर्स वेगवेगळ्या शहरांमधल्या रस्त्यांवर लागली आहेत. पण “उंच महत्वाकांक्षेचे खुजे कर्तृत्व”, अशीच पक्षाची खरी अवस्था आहे. कारण शरद पवार यांच्या 83 व्या वर्षी देखील पक्षाने आमदारांची पंचाहत्तरी गाठलेली नाही. त्यामुळे हा आकडा निदान पक्षाच्या पंचविशीत तरी गाठणार का??, हा सर्वांत कळीचा प्रश्न आहे.

नेमका वारस कोण?? भेडसावणारा प्रश्न

कारण आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रापुरते “महाराजकीय ध्येय” ठेवले, ते मूळातच 100 आमदारांचे आहे. म्हणजे पूर्ण बहुमताचे नाही. त्यातही ध्येय ठेवलेल्या 100 आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स नेहमीच 55 – 60 आमदारांच्या आसपास राहिला आहे. त्यापलीकडे राष्ट्रवादीला कधीही यश मिळालेले नाही. लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला कधीच डबल डिजिट खासदार निवडून आणता आलेले नाहीत. शरद पवारांची राजकीय प्रतिमा राष्ट्रीय पातळीवरची आणि पक्षाचे राजकीय कर्तृत्व प्रादेशिक, त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरते उपप्रादेशिक राहिल्याचे पक्षाच्या पंचविशीत ठळकपणे अधोरेखित होते.

वारसाचा निर्णय शिष्योत्तम करणार?

भले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे आज भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स वर झळकली असतील, तरी प्रत्यक्षात शरद पवारांचा मुख्य राजकीय वारस नेमका कोण??, हाच प्रश्न आगामी काळात सातत्याने भेडसावणारा ठरणार आहे!! या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आसपासच शोधावे लागणार आहे. पण “ते” उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाधान करेल की नाही??, याचा खरा निर्णय पवारांचे दिल्लीतले “शिष्योत्तम” करणार आहेत!!

NCP@25 : will party succeed in getting 75 miles in maharashtra state assembly??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात