प्रतिनिधी
नाशिक / कोल्हापूर : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असतानाच आता नव्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.Major rift irrupt in MVA over flood affected compensation in Maharashtra
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूर येऊन दोन महिने उलटले तरी इथल्या पूरग्रस्तांना ठाकरे – पवार सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप दिलेली नाही. त्यावरून शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकास्त्र सोडले असून पूरग्रस्तांना अद्याप मदत दिली नाही म्हणून कोसले आहे. येत्या आठ दिवसात पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत दिली नाही तर मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे तर राजू शेट्टी यांच्याही पुढे गेले आहेत. त्यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात दावा ठोकला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मदत दिली तशी उत्तर महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना मदत दिली नाही, असा त्यांनी भुजबळ यांच्यावर आरोप ठेवला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या बैठकीत छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात मोठा वादही झाला होता. परंतु त्या वादानंतरही छगन भुजबळ यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना मदत दिली नाही म्हणून सुहास कांदे यांनी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीत सामील असलेले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत नाव असलेले राजू शेट्टी महाविकास आघाडीचे सरकारचे वाभाडे काढत असताना कोल्हापूरचे पालकमंत्री काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मात्र आघाडी सरकारच्या या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे.
पूरग्रस्तांना मदत करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. परंतु अजून पंचनामे झाले नसल्याने मदत दिली नाही. पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्यात येईल आणि राजू शेट्टी यांनाच गाडीत घेऊन आम्ही फिरू, असा टोला त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. पण एकूण पूरग्रस्तांच्या मदतीवरून महाविकास आघाडीतच कसा बेबनाव झाला आहे हे राजू शेट्टी आणि सुहास कांदे यांच्या टीकेवरून उघड्यावर आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App