अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरली, पहाटेच्या शपथविधीवरून चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीवरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. Ajit Pawar steals list of 54 MLAs from Sharad Pawar’s drawer, Chandrakant Patil’s attack on morning swearing in


प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीवरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय १४ महिन्यांचा जुना आहे, आता का काढता असा सवाल अजित पवार यांनी केल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली. त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती.

कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, हे अजित पवार यांचे विधान दांभिकपणाचे आहे. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला नीट चालवला नाही म्हणून मराठा आरक्षण गमावले. या सरकारच्या चुका न्यायालयाच्या निकालपत्रात पानोपानी दिसतात. या निकालाच्या विरोधात एक महिन्यात फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती.ग पण सरकारने उशीर केला. त्यांनी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. आम्ही महिनाभर जे मुद्दे मांडत होतो, तशाच शिफारशी या समितीने केल्या आहेत.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी १६ तारखेला कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Ajit Pawar steals list of 54 MLAs from Sharad Pawar’s drawer, Chandrakant Patil’s attack on morning swearing in

महत्त्वाच्या बातम्या