आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा १४१ वा पुण्यस्मरण दिन


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात १९ व्या शतकात लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ ) हे क्रांतिकारक होऊन गेले. ते शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक होते. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते. १८५७ च्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी मोठी मदत केली. 141st Remembrance Day of ‘Adhyakrantiveer’ Lahuji Vastad Salve

लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे ‘राऊत’ या नावाने प्रसिद्ध होते. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील संगम पुलाच्या परिसरातील एका झोपडीवजा घरामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. १७ फेब्रुवारी १८८१ हा तो दिवस होता. आज लहुजी वस्ताद साळवे यांचा १४१ वा पुण्यस्मरण दिन आहे.लहुजी साळवे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे पराक्रमी घराणे असून छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींचे आजोबा लहुमांग यांस ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती.

खडकीच्या युद्धात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्ध लढताना राघोजी धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली. शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन दाट झाडीमध्ये जागा निवडली.

महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले.

१८५७ च्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. महात्मा फुले यांच्या दलितोद्धारात लहुजी यांनी सर्वतोपरी सहकार्य केले महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली. लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

141st Remembrance Day of ‘Adhyakrantiveer’ Lahuji Vastad Salve

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण