विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा असे संबोधल्यावर भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना वखवखलेल्या आत्म्याची उपमा दिली, पण त्याचवेळी त्यांनी होय, आम्ही आमच्या मुलांसाठीच फिरतो, अशी कबुली देऊन टाकली. Uddhav thackeray compared PM Modi with thirsty ghost
महाराष्ट्राची निवडणूक सर्वसामान्य जनता आणि राजकीय पक्षांचे उमेदवार अशी आता उरलेलीच नाही. ती आता आत्म्यांभोवती फिरू लागली आहे. पुण्यात रेस कोर्स वरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणाले. मोदींना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे वखवखलेला आत्मा म्हणाले!!
शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची खडकवासल्यात सभा झाली. या सभेत काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित असले तरी बाकीचे नेते आणि शरद पवारांचे भाषण आधी झाले आणि प्रमुख भाषण मात्र उद्धव ठाकरे यांचे झाले.
शरद पवारांना मोदींनी भटकती आत्मा म्हटल्यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा वखवखलेला आत्मा अशा शब्दांमध्ये उद्धार केला. पण त्याच वेळी त्यांनी शरद पवार आणि आपण स्वतः आपल्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली दिली. होय आम्ही आमच्या मुलांसाठीच फिरतो. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, पण आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायचे का नाही, हे जनता ठरवेल. पण सध्या महाराष्ट्रात येऊन एक वखवखलेला आत्मा स्वतःसाठीच फिरतो आहे. फिरणे स्वतःसाठी आणि काम फक्त आपल्या मित्रांसाठी असेच त्या वखवखलेल्या आत्म्याचे धोरण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचे वाभाडे काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App