विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले. त्यांचे चेले जयंत पाटील कोणत्याही क्षणी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसणार असल्याच्या अटकळी बांधल्या गेल्या. अशी घडामोड पवारांच्या पक्षात घडत असताना उद्धव ठाकरेंचे खासदार फोडायची एकनाथ शिंदेंना घाई झाली. या राजकारणावरून ठाकरेंच्या शिलेदारांनी पत्रकार परिषदेत चिडचिड केली. पण या सगळ्या राजकारणाची मजा घेताना एकट्या भाजपने संघटन पर्वावर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसले. Thackeray, Pawar, Shinde
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद पुरेपूर वापरून घेऊन शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा “राजकीय डाव” साधला. त्यामुळे ठाकरे सेना घायाळ झाली. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पवारांवर तोफा डागल्या. पत्रकार परिषदांमध्ये भरपूर चिडचिड करून घेतली. ठाकरे यांच्या शिलेदारांच्या चिडचिडीला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपायच्या नावाखाली पवारांच्या चेल्यांनी प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी ठाकरेंच्या शिलेदारांवर तोंडसुख घेतले.
शिंदेंच्या सत्काराला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हजर राहिले. एकनाथ शिंदे यांचे शिलेदार केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या स्नेहभोजनात ठाकरेंचे तीन खासदार संजय उर्फ बंडू जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे जेवून गेले. दरम्यानच्या काळात उदय सामंत आणि नरेश म्हस्के “६ जनपथ” वर शरद पवारांना भेटले. तिथे म्हणे त्यांनी साहित्य संमेलन विषयक चर्चा केली. संजय दिना पाटील आणि उदय सामंत हे एकेकाळी पवारांचेच चेले होते. पण आता ते ठाकरे आणि शिंदे यांच्या गोटात घुसून राजकारण साधू पाहत आहेत.
पवार, ठाकरे आणि शिंदे या तिघांच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये असले सगळे “साहित्य संमेलनी” आणि “स्नेहभोजनी” राजकारण सुरू असताना भाजपचे नेत्यांनी त्याची मजा घेतली. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या चांगले मुख्यमंत्री होते हे शरद पवारांना उशिरा कळले, असा टोमणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना मारला. पण ते तेवढ्या कमेंट पुरतेच राहिले.
त्या पलीकडे जाऊन त्याच वेळी आगामी महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांवर डोळा ठेवून संघटन पर्वाकडे लक्ष देण्याचा इरादा भाजपच्या नेत्यांचा दिसला. कारण चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या प्रांतांमध्ये सहा सात दिवस प्रवास करून भाजपची सदस्य नोंदणी दीड कोटी पर्यंत पोहोचविण्याचा इरादा बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपचे महाराष्ट्रात एक कोटी सदस्य पूर्ण झाले. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता ती सदस्य संख्या आणखी 50 लाखांनी वाढविण्याची महत्त्वाकांक्षा भाजपच्या नेत्यांनी बाळगली आणि त्या दृष्टीने आठवडाभराचे दोन मोठ्या नेत्यांचे दौरे त्यांनी आखले. त्याची सुरुवात देखील केली.
त्याउलट ठाकरेंच्या नेत्यांनी रोजच्या पत्रकार परिषदा घेण्यात धन्यता मानली. पवारांनी साहित्य संमेलनी राजकारण साधून घ्यायचा प्रयत्न केला. शिंदेंनी ठाकरेंना डिवचण्यात आणि त्यांचे खासदार फोडण्यात वेळ घालवला. यापैकी कुठल्याही नेत्याने आपल्या पक्षाच्या संघटनेवर किंवा संघटना वाढीवर काही काम केल्याचे दिसले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App