नाशिक : अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांचे मिळून साधारण 50 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन्ही पक्ष मोडून टाकतील, असा दावा करून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली. पण 50 आमदार भाजपमध्ये जाण्याचे भाकीत करून संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना आणि एकनाथ शिंदेंना इशारा दिला, की त्यांनी आमदारांच्या भाजपा प्रवेशाची वातावरण निर्मिती केली??, असा सवाल या निमित्ताने समोर आला.
शरद पवारांच्या खासदारकीसाठी वातावरण निर्मिती
कारण काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी अशीच वातावरण निर्मिती करून शरद पवारांची राज्यसभेची खासदारकीची राजकीय बेगमी करून दिली होती. शरद पवार अन्य कुठल्याही नेत्याशी त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकी विषयी बोलले नव्हते. अगदी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांशी सुद्धा काही बोलून त्यांनी जाहीरपणे इच्छा व्यक्त केली नव्हती, पण संजय राऊत यांनीच शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीचा बॉल महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात टाकला. त्यातून त्यांनी एकदम ठाकरे सेना आणि काँग्रेस यांची कोंडी केली. शरद पवारांना पाठिंबा द्यावा, तर शिवसेनेचा एक खासदार गमावला जातो आणि पाठिंबा न द्यावा, तर शिवसेनेचाच उभा केलेला उमेदवार भाजपकडून पाडला जातो, अशा तोंडीत ठाकरे सेना अडकली होती. त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा राज्यसभा खासदारकीची संधी हवी होती, ती शरद पवारांच्या खासदारकीमुळे गमावली गेली.
पण त्या पलीकडे जाऊन भाजपने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या उमेदवारीसाठी अनुकूल डाव टाकून महाविकास आघाडीत कायमची पाचर मारण्याचा डाव साधून घेतला.
पण एकूण शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी संजय राऊत यांनी वातावरण निर्मिती करून ती खासदारकी त्यांना मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता.
50 आमदार फुटायची वातावरण निर्मिती
आज संजय राऊत यांनी सुनेत्रा राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांचे 50 आमदार फुटून भाजपमध्ये सामील होतील. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांचे सहकारी होते. ते सुनेत्र पवारांचे सहकारी राहतीलच असे नाही, असा दावा करून प्रत्यक्षात तशी वातावरण निर्मितीच करायला सुरुवात केली. कारण संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना किंवा एकनाथ शिंदे यांना कुठला इशारा देण्याची बिलकुल स्थिती नाही. एकतर हे दोन्ही नेते भाजपच्या अंकित आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी किंवा अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा कुठला राजकीय पंगा घेण्याची सुनेत्रा पवार किंवा एकनाथ शिंदे यांची क्षमता नाही. कारण तसा पंगा घ्यायचा नुसता प्रयत्न केला, तरी हे दोन्ही नेते राजकीय दृष्ट्या कायमचे अडचणीच्या खाईत पडू शकतात, याची पक्की माहिती त्यांना आहे. मूळातच सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे स्वतंत्र अस्तित्वच भाजपच्या श्रेष्ठींच्या इच्छेवर अवलंबून आहे.
सुनेत्रा पवार आणि शिंदे यांच्यासाठी पक्ष सावरणे अवघड
अशा स्थितीत संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांना कुठला इशारा दिला आणि म्हणून त्या इशाऱ्याच्या आधारे या दोघांनीही आपला पक्ष स्वतःला हवा तसा सावरून धरला, असे घडण्याची सुतराम शक्यता नाही. त्या उलट संजय राऊत यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या पडझडीची वातावरण निर्मितीच केली, असेच मानायला भरपूर वाव आहे. शिवाय या वातावरण निर्मितीतून फक्त सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटेल असे नाही, तर उलट ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटून तिची शकले पडायची सुद्धा दाट शक्यता आहे. कारण तशी चिन्हे उघड दिसलीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App