विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्याचे राजकीय लळित दुसऱ्या दिवशी पण सुरूच आहे. क्रॉस व्होटिंग नेमके कुणी केले, हे जयंत पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या कोट्यातील 7 मते फुटली. ती मते महायुतीला गेली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 मत फुटले. त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावे लागले. स्वत: जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. एवढेच नव्हे तर शरद पवार गटाच्या कोणत्या आमदाराने मतदान केले नाही, त्याचे नावच जयंत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. Sharad pawar’s NCP’s mla mansingh naik didn’t vote for pep jayant patil
पराभवानंतर जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर गेले होते. पण पवारांची तब्येत बरी नाही. ते कुणाचेही फोन घेत नाहीत, असे सांगत जयंत पाटील पवारांना न भेटताच सिल्वर ओक वरून परत आले. किंबहुना त्यांना परत यावे लागले.
त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना या आमदाराचे नाव घेतले. शरद पवार गटाकडे 12 मते होती. त्यातील 11 मते मला मिळाली. एक मत माझ्या मित्राचं होतं. त्यामुळे माझ्या मतांची संख्या 12 झाली. आमदार मानसिंग नाईक यांचे मत फुटले. मानसिंग नाईक मतदानाला आयत्यावेळी आले. मिटिंगला आमच्यासोबत होते. मतदान करण्यापूर्वी आम्हाला भेटून गेले. पण मला मत दिले नाही. कोण कोणाला मतदान करते ते कळते. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही पक्षाची भक्कम मते मला मिळाली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मला 12 वे मत मिळाले. ते महायुतीतील माझ्या मित्राचे मत होते. म्हणजे महायुतीचे 1 मत फुटले, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तरी आम्ही थोडे बेसावध राहिलो. आमची ताकद कमी आहे, त्यामुळेच हा निकाल आला. माझ्या पराभवाने माझे सहकारी आणि सभागृहही हळहळले, असे जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या पसंतीने जिंकला
काँग्रेसची दुसरी पसंती मला होती. मला फक्त तीन मते हवी होती. नाही तर विजय आमचाच होता. महाविकास आघाडीकडे 69 मते होती. समान वाटप झालं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. काँग्रेसची मते फुटलेली दिसत आहेत. काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली हे दुर्देव आहे, असंही त्यांनी सांगितलं.
या निवडणुकीत घोडेबाजार झाला. कुणाला वर्क ऑर्डर मिळाल्या. कुणाला पैसे मिळाले असं मी ऐकतोय. 20 कोटी रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. मी एवढी मोठी रक्कम एकत्रपणे कधी पाहिली नाही, असं सांगतानाच निवडणुकीचा अंदाज आल्यानंतर मी मतदान केंद्राबाहेर पडलो होतो. निकाल काय लागेल एव्हाना लक्षात आले होते, असंही ते म्हणाले.
180 जागा जिंकू
विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. महायुतीसाठी विधानसभा सोपी नाही. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 180 जागा मिळतील, असा दावा करतानाच आता भाजपवाले चंद्रावरही सत्ता स्थापन करतील, असा चिमटाही त्यांनी काढला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App