विशेष प्रतिनिधी
नाशिक : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त केला. छगन भुजबळ यांनी मला, पक्षाला व माझ्या सहकाऱ्यांना फसवले. त्यामुळे त्यांना कोणत्याही स्थितीत घरी बसवा, असे ते म्हणालेत. छगन भुजबळांविरोधातील लढाई आपण जिंकू, जिंकू, जिंकू, असेही ते यावेळी म्हणाले.Sharad Pawar
शरद पवार यांची मंगळवारी नाशिकच्या येवल्यात प्रचारसभा झाली. येवला हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शरद पवार तिथे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार शरद पवारांनी तिथे भुजबळांवर टीकेची झोड उठवत मतदारांना निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले.
भुजबळांना जेलमध्ये भेटण्यास गेलो, पण…
शरद पवार म्हणाले, आजची सभा ऐतिहासिक आहे. आमच्या पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी लोकांची सेवा केली आहे. मी मागच्या सभेत या मतदारसंघात आमच्याकडून चूक झाल्याचे म्हटले होते. आम्ही छगन भुजबळ यांना विधानसभा, विधानपरिषदेवर संधी दिली. विरोधी पक्षनेतेपद दिले. पण त्यांनी काही उद्योग केले. त्यामुळे त्यांना पद सोडावे लागले. ते तुरुंगात गेले. त्यांना तिथे भेटण्यासाठी कुणीही जात नव्हते. माझी मुलगी व मी त्यांना भेटण्यास गेलो. त्यांना पुन्हा संधी दिली. त्यानंतर तुम्ही त्यांना निवडूनही दिले. मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेतली. त्याचे अध्यक्षपद भुजबळांकडे दिले. उपमुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतरही ते आणखी उद्योग करत होते. त्याचे परिणाम सरकारला सोसावे लागले.
आच्या सहकाऱ्याने आमचा पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी घरी आले. जे झाले ते वाईट झाले समजूत काढण्यास जाऊ का? असे मला विचारले. पण ते गेले ते परत आलेच नाही. त्यानंतर त्यांनी थेट शपथच घेतली, असे शरद पवार भुजबळांवर हल्लाबोल करताना म्हणाले.
आपण ही लढाई जिंकू, जिंकू, जिंकू
एखाद्या माणसाने किती चुकीची कामे करावीत, फसवेगिरी किती करावी याला काही मर्यादा असतात. या सर्व मर्यादा भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत. ज्या व्यक्तीला स्वकियांविषयी आस्था नाही. ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचारांप्रती आस्था नाही, त्या व्यक्तीला पुन्हा निवडून द्यायचे नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. मी यापूर्वीही याठिकाणी आलो. तुम्ही येथे परिवर्तन करणार यात शंका नाही. तुम्ही मला प्रचंड प्रतिसाद दिला. मी सुद्धा पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभा राहिलो. आताही आपण ही लढाई प्रचंड मतांनी जिंकू, जिंकू, जिंकू, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App