विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण वाचवा आंदोलन यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच “डबल गेम” खेळते की काय??, असा संशय तयार झाला आहे. आधी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय इंधन पुरवठा करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी आज अचानक लक्ष्मण हाके यांच्या स्टेजवर जाऊन त्यांची भेट घेतली. ते तिथे 5.00 मिनिटे थांबले आणि नंतर निघून गेले. पण त्यामुळे संशयाचे मळभ मात्र पवारांच्या राष्ट्रवादीवर पसरले. sharad pawar mla rajesh tope meet obc reservation activist laxman hake at wadigodri jalna
ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ हाके यांना येऊन भेटणार आहे. मात्र, त्यापूर्वी शनिवारी सकाळी शरद पवार गटाचे आमदार राजेश तडकाफडकी वडीगोद्री येथे दाखल झाले. त्यांनी याठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची भेट घेतली. उपोषणाच्या व्यासपीठावर साधारण 5 मिनिटे थांबून राजेश टोपे तिथून निघून गेले. पण याच राजेश टोपे यांनी आधी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला इंधन पुरवठा केल्याने त्यांच्याविषयीचा संशय वाढला.
यावेळी प्रसार माध्यमांनी राजेश टोपे यांना, तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी इतक्या उशीरा का आलात??, असा प्रश्न विचारला. त्यावर राजेश टोपे यांनी उत्तर देणे सुरुवातीला टाळले. पण नंतर मात्र आपण सेक्युलर विचाराचे आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे आहे. कुठेही समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशा स्वरुपाने हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला याठिकाणी येऊन भेट द्यावी, असे मला वाटले. त्यासाठी मी आज याठिकाणी आलो. गेल्या 5 – 6 दिवसांमध्ये मी मुंबई, पुण्याला, पंढरपूरमध्ये होतो. आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सुटावा. महाराष्ट्र हा साधूसंतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि समाजसुधारकांचा आहे. त्यामुळे इकडे कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, असे वाटत असल्याच त्यांनी सांगितले.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला वाढता पाठिंबा हा नांदेड जिल्ह्यातून मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा लक्ष्मण हाके याना पाठींबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील ओबीसी समाज बांधवांचा आतापर्यंत 300 गाड्याचा ताफा हा जालना येथील वडीगोद्री येथे रवाना झाला आहे. शनिवारी सकाळी 100 गाड्या या वडीगोद्री येथे रवाना झाल्या आहेत. आम्हाला आरक्षण संविधानाने दिलेले आहे. मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे, पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली.
भुजबळांसह 6 मंत्री लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना भेटणार
मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील. हे शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड.मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App