विशेष प्रतिनिधी
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींवर आगपाखड करत आहेत. दुसरीकडे शनिवारी शरद पवारांनी ( Sharad Pawar )अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath Shinde )यांची भेट घेतली. औपचारिकपणे ही भेट मराठा-ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्ष व साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी होती. मात्र पवारांसह अदानी समूहाचे लोकही उपस्थित होते. त्यामुळे शिंदे-पवारांमध्ये धारावीविषयी चर्चा झाल्याचा दावा विविध माध्यमांनी केला आहे.
उद्धव यांनी अदानींविरुद्ध मुंबई मनपावर मोर्चा काढला होता. आता विधानसभेचे वेध लागताच त्यांनी पुन्हा अदानींवर टीका केली. सत्तेत आल्यास धारावी प्रकल्प रद्द करू, असे जाहीर केले आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांच्या तात्पुरत्या निवास शिबिरांना उद्धवसेनेचे पदाधिकारी विरोध करत आहेत. राहुल गांधी तर वारंवार अदानींवर हल्लाबोल करत आहेत. पण शरद पवारांनी मात्र अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत नेऊन शनिवारी मुख्यमंत्र्यांशी धारावीविषयी ३० मिनिटे चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, पत्रकारांशी बाेलताना शरद पवारांनी आपण शिंदेंच्या भेटीला गेल्यानंतर कदाचित तिथे अदानींचे लाेक आले असावेत, असे सांगितले.
शिंदेसेनेचे आरोप – तीन मुद्द्यांवर उद्धव ठाकरे, काँग्रेसची कोलांटउडी
1. धारावीची निविदा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तयार झाली. त्यात ३५० चौरस फुटांचा फ्लॅट देण्याचे म्हटले होते. आता ठाकरेच ५०० चौरस फुटांची मागणी करत आहेत. 2. उद्धव ठाकरेंनी धारावीची नवीन निविदा तयार केली. त्या वेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मंत्री होत्या. तेव्हा त्या शब्दानेही बोलल्या नाहीत. आता त्या विरोध करत आहेत. 3. शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, २०१८मध्ये मुंबई मनपात उद्धव ठाकरेंची सत्ता होती. त्यांनीच उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मुंबईत कोणत्याही ठिकाणी टीडीआर विकण्याची तरतूद केली. धारावीच्या निविदेतील टीडीआरची तरतूद मुंबई मनपाने २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या अधीन आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more