प्रतिनिधी
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात काय कमावले, काय गमावले या विषयावर राज ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचावेत, असा सल्ला दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील आरोपांचा पुनरूच्चार केला. Raj Thackeray targets NCP and Sharad Pawar over casteism in maharashtra
प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याचा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, की गेल्या १५ – २० वर्षामध्ये शाळा, कॉलेजमध्ये जाती आल्या. हे सरसकट विधान नाही. पण पत्रकारितेतही जाती आल्या. बातमी व्यतिरिक्त जाती आल्या. १५ – २० वर्षांपूर्वी हे नव्हते. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला. त्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती जातींमध्ये व्देष वाढला. हे सगळे डिझाइन आहे. याचे परिणाम महाराष्ट्रात भयानक, भीषण असतील, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
नीरज चोप्रा जो पर्यंत जिंकत नव्हता, तो पर्यंत तो चोप्रा होता. तो जिंकल्या बरोबर चोपडे झाला, असा टोला देखील राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला. तो पक्ष जातिवादी वातावरण तयार करतो.
राज ठाकरे यांनी आपल्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, की मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावले आणि गमावले याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितले की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले, की जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिले, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाही असे करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App