विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत भव्य जनजाती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सत्संगात देशभरातील सुमारे 25 हजार जनजाती भाविक उपस्थित राहून आपल्या धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या रक्षणाचा संकल्प करणार आहेत.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम देशभरातील 12 कोटी जनजाती समाजाच्या धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या रक्षणासोबतच जनजाती क्षेत्रात विविध सेवाकार्य राबवत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभरात आयोजित विविध कुंभपर्वात जनजाती समाजाला एकत्र आणून आपल्या प्राचीन संस्कृतीचे विराट दर्शन घडविण्यासाठी कल्याण आश्रम निरंतर प्रयत्न करत आहे. नाशिक, उज्जैन, प्रयागराज अशा कुंभमेळ्यात आतापर्यंत जनजाती समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.
प्रयागराजयेथे सुरू असलेल्या ऐतिहासिक महाकुंभाच्यानिमित्ताने यंदाही जनजातीसत्संगाचे भव्य आयोजन कल्याणआश्रमाच्या वतीने करण्यातआले आहे. ता. 6 फेब्रुवारीते 10 फेब्रुवारीपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये देशभरातील 25 हजारांहून अधिक जनजाती समाज एकत्र येऊन स्वतःच्या धर्म,संस्कृती आणि परंपरेच्या रक्षणाचा संकल्प करेल.
यंदा 6 फेब्रुवारी रोजी युवा कुंभाचे आयोजन होणार आहे, हे या कुंभपर्वाचे वैशिष्ट्य आहे. यात देशभरातील 10 हजार युवक सहभागी होऊन या विराट सांस्कृतिक महासागराचे दर्शन करतील. या कार्यक्रमात 20 निवडक प्रतिभावंत युवकांचा सन्मानही केला जाणार आहे. ता. 7 फेब्रुवारी रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील आलेले जनजाती बंधु आणि भगिनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषा आणि नृत्यासह कुंभस्नानाचे पुण्य प्राप्त करतील. या जनजाती सत्संगात देशभरातील विविध जनजातींची सुमारे 150 नृत्य पथके सहभागी होणार आहेत. ती त्यांच्या पारंपरिक नृत्य – संगीताचे सादरीकरण करून “तू मी एक रक्त” या भावनेचा संदेश संपूर्ण जगाला देतील. हे सांस्कृतिक कार्यक्रम 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी जनजातीय नृत्य – संगीतासह होतील. चार वेगवेगळ्या मंचावर हे सांस्कृतिक प्रदर्शन होईल.
या सत्संगात 10 फेब्रुवारी रोजी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रांतांतून आलेली जनजाती समाजातील संत मंडळी धर्म- संस्कृतीवरील त्यांचे विचार मांडतील. यात मुख्यतः महामंडलेश्वर यतींद्रानंद गिरी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी, आचार्य महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले बाबा) इत्यादी प्रमुख संत मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.
2025 हे वर्ष जनजाती अस्मितेचे नायक असलेले भगवान बिरसा मुंडा यांचे 150 जयंती वर्ष आहे. ऐतिहासिक महाकुंभाच्या पर्वात हे वर्ष आलेले असल्यामुळे एक उत्सव पर्व म्हणून हा कुंभ साजरा करण्याचा संकल्प घेऊन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न सेवा समर्पण संस्थानचे कार्यकर्ते या आयोजनाच्या यशासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App