पवारांना अपेक्षित अजेंडा मराठी माध्यमांनीच केला “फेल”!! वाचा, कोणता आणि कसा??

Pawars expected agenda was failed by the Marathi media

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातल्या राजकीय कलगीतुऱ्यामध्ये शरद पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जो विशिष्ट “राजकीय अजेंडा” छुप्या पद्धतीने पत्रकारांच्या समोर आणायचा प्रयत्न केला होता, तो अजेंडा दुर्लक्षित करून मराठी माध्यमांनीच तो “फेल” करून टाकला!! Pawars expected agenda was failed by the Marathi media

पवारांच्या पत्रकार परिषदेच्या वेगवेगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी रंगवून जरूर दिल्या. पण पवारांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, जो अजेंडा महाराष्ट्रभर सेट करायचा होता, तो पवारनिष्ठ मराठी पत्रकारांना देखील नीटसा समजला नाही त्यामुळे तो पहिल्याच झटक्यातच “फेल” झाला!!

  • पवारांचे दोन मुद्दे दुर्लक्षित

तो अजेंडा कोणता??, याचा नीट बारकाईने विचार केला, तर पवारांच्या पत्रकार परिषदेतले दोन मुद्दे अधोरेखित करून सांगितले पाहिजेत. ते मुद्दे होते, महाराष्ट्रात गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमधून मुली गायब झाल्याचे आकडे पवारांनी दिले. त्याचबरोबर पवारांनी आपण पंचायत समित्या ते महापालिका एवढ्या पुरतेच महिलांचे 33% आरक्षण देऊ शकलो, अशी कबुली देऊन पुढचे विधिमंडळ आणि संसदेतले महिला आरक्षण मोदी सरकारने द्यावे. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असे जाहीर केले. याचा अर्थ पवारांना पत्रकार परिषदेतून त्यांचा “विशिष्ट महिला अजेंडा” पुढे सरकवायचा होता, हे दिसून येते. याच्या बातम्या मराठी माध्यमांनी जरूर दिल्या पण त्यातून पवारांना अपेक्षित अजेंडा काही सेट होऊ शकला नाही. तो अजेंडा नेमका कोणता होता??, तर पवारांना देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कसे अपयशी आहेत, हे महाराष्ट्राच्या मनावर ठसवायचे होते. त्यावर महाराष्ट्रात बबाल खडा करायचा होता. निदान त्याची सुरुवात करायची होती आणि महिला आरक्षणाचा मुद्दा त्यांना महाराष्ट्रापुरता का होईना, पण ऐरणीवर आणायचा होता. प्रत्यक्षात पवारांनी मांडलेल्या या दोन मुद्द्यांच्या फक्त बातम्या झाल्या. पण त्या दुर्लक्षिल्या गेल्या.

मराठी माध्यमांचे सर्व लक्ष देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार यांच्या राजकीय कलगीतुऱ्यावरच राहिले. कोणी कोणाला गुगली टाकली?, कोणी कोणाला सिक्सर मारला?, याची बहारदार वर्णनेच मराठी माध्यमांनी केली. त्यातून पवारांना अपेक्षित अजेंडा दुर्लक्षित राहिला.  • महिलांचे विषय आत्ताच का सुचले??

पण पवारांना मूळात महाराष्ट्रातील महिला असुरक्षितता आणि महिला आरक्षण हे दोन मुद्दे छुप्या पद्धतीने का होईना, पण अजेंड्यावर आत्ताच आणावेसे का वाटले असावेत??, याचे उत्तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये आहे. पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नेमले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपवले आहे. अशावेळी सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान महाराष्ट्रात बसविण्यासाठी “महिला अजेंडा” याच्यासारखा दुसरा उपयुक्त विषय पवारांना सापडला नाही. तो विषय अजेंड्यावर सुरू करून देऊन नंतर तो फुलवत न्यायचा, वाढवत न्यायचा ही पवारांची “पॉलिटिकल ट्रिक” होती आणि ती मराठी माध्यमांनी सुरुवातीलाच “फेल” करून टाकली!!

  • अजेंडा मांडणे आणि मोडणे

पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत वेगवेगळ्या पंचवार्षिक निवडणुकांच्या आगे मागे वेगवेगळे अजेंडे असेच मागे पुढे सरकवल्याचा इतिहास आहे. मग त्यामध्ये “मराठा अजेंडा” असो, त्यानिमित्ताने भांडारकरचा विषय असो, किंवा अगदी भाजपचे सरकार आल्यावर मराठा आरक्षणापासून ते इतिहासाची “पुरोगामी फेरमांडणी” असो, पवारांनी महाराष्ट्रातल्या स्वतःच्या राजकारणासाठी हे अजेंडे सेट केले आणि मोडले. एवढे करूनही पवारांना यश मात्र फार मर्यादित मिळाले.

  •  फडणवीसांना अपयशी नाही ठरवू शकले

आता जेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान महाराष्ट्रात बसवण्याचे घाटत आहे, त्यावेळी त्यांना “पॉलिटिकली सूटेबल” होईल, असा महिला अजेंडा पवार पुढे सरकवू इच्छितात आणि त्याचे सूतोवाच पवारांनी कालच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केले होते. पण त्याच्या “फक्त बातम्या” झाल्या. फडणवीस अपयशी गृहमंत्री असल्याचा ठपका पवार पूर्णपणे ठेवू शकले नाहीत. उलट फडणवीस यांचीच खणखणीत प्रत्युत्तरे मराठी माध्यमांमार्फतच त्यांना ऐकावी लागली. त्यामुळे पवारांना अपेक्षित असलेला “महिला अजेंडा” महाराष्ट्रात सुरुवातीलाच पुढे सरकू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे!!! m

Pawars expected agenda was failed by the Marathi media

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*