जगन्माता देवीच्या रुपात अवतीर्ण झाली. कधी रेणुका, कधी दुर्गा, कधी काली तर कधी अन्नपूर्णा. ती जननी झाली तशी अनेक नाती तिने स्वीकारली. मानवरूपात आई, आजी, बहीण, मावशी, आत्या, काकू या सगळ्या भूमिकांमध्ये त ती असते. navratri vishesh articles five
भावंड लहान असोत वा मोठी निर्व्याज प्रेम करणारी, कुठेही असली तरी भावंडांसाठी देवाची करुणा भाकणारी असते ती म्हणजे बहीण. आपल्या संस्कृतीत तर या निरलस नात्याचे किती महत्त्व सांगितले आहे. रक्षाबंधन, भाऊबीज या सारखे मंगल पवित्र असलेले सण साजरे करायची पद्धत आहे.
बहीण मग ती कोणतीही असो, शुद्ध प्रेम हाच भाव तिच्या ठायी असतो. कृष्णाच्या बोटाला लागून रक्ताची धार लागली हे ऐकताच कासावीस होऊन आपला मौल्यवान भरजरी पितांबर फाडून चिंधी देणारी दौपदी आणि त्या चिंधीची जाण म्हणून भर सभेत तिला वस्त्र पुरविणारा तिचा मानस बंधु श्रीकृष्ण हे या निर्मळ प्रेमाचे योग्य उदाहरण ठरावे.
भावंडांकडून चूक होत आहे हे लक्षात येताच त्यांना योग्य सूचना करणारी. ऐकले नाही तर पाठीत हक्काने धपाटा घालणारी, पण मायेने पुन्हा कुरवाळणारी बहीण असते. लहान असली तरी गोडी गुलाबीने लाड करवून घेणारी तरी वेळप्रसंगी पाठी भक्कमपणे उभी असणारी ती बहीण असते. हे स्त्रीपात्र ज्याच्या आयुष्यात नाही त्याने आयुष्याची गोडी चाखली नाही असे म्हणावे लागेल.
ज्ञानेश्वर माऊली समाजाच्या आरोपांनी दुखावले गेले आणि रुसून ताटी बंद करून बसले. त्यावेळी काळजीने अभंग रचून दाराशी बसुन त्यांचे मनोधैर्य वाढवणारी लहानगी मुक्ताबाई आणि माऊलींच्या लालेलाल पाठीवर मांडे भाजणारी मुक्ता हे भावंडांतले निर्मळ प्रेम नव्हे काय??
लग्न होऊन सासरी जाताना बघावे, सगळ्यात जास्त कोण बहिणीची खंत काढते?बहिणीलाही सगळ्यात जास्त आठवतात ती आपली भावंडे.
बहीण म्हणजे आई इतकीच माया करणारी ताई. ती आईचे प्रतिरुप. एकतरी बहीण प्रत्येक व्यक्तीला हवीच तरच नात्यातील गोड गुंफण विणली जाईल आणि जीवनातील बहीण नावाचं सुख ओसंडून वाहात राहील. तिचे आशीर्वाद आणि शुभेच्छा जगायला बळ देतील.
नवरात्रीच्या या जागरात समाजातील प्रत्येक स्त्रीस आपली भगिनी मानून तिच्या सुरक्षेची, मानसन्मानाची काळजी घेऊ या. तिला कौरवांच्या तावडीतून रक्षणारे आपण कृष्णरुप भावंड होऊ या!!
या देवी सर्वभूतेषू भगिनी रुपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमत्स्यै नमोनमः
वाचकांना मनोनमन !!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App