नाशिक :MVA leaders महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा कौल मिळून त्यांची सत्ता येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने खरेतर आत्मपरीक्षण करायला हवे होते, पण ते आत्मपरीक्षण करायचे दिले सोडून आणि परीक्षकाचाच गळा धरायला चाललेत धावून!! अशी त्यांची अवस्था झाली आहे.
वास्तविक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा “ॲडव्हान्टेज” अडवांटेज मिळाला होता तो “ॲडव्हान्टेज” टिकवून ठेवण्याचे काम शरद पवार + उद्धव ठाकरे + नाना पटोले आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांचे होते, पण या सगळ्यांनी स्वतःच्या राजकीय अहंकारात मशगूल राहात जागावाटपाचा घोळ घालण्यापासून ते उमेदवार जाहीर करण्यापर्यंत अनागोंदी कारभार केला. लोकसभा निवडणुकीतल्या विजयातून ते काही शिकलेच नाहीत. उलट जे शिकले, ते आपण काही केले कसेही वागलो, तरी महाराष्ट्रातली जनता जातीपातीच्या नावावर फ्री वाटपाच्या नावावर आपल्यालाच मते देईल, याची “खात्री” शरद पवार + उद्धव ठाकरे + नाना पटोले आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांना होती. या सगळ्यांना “पवारनिष्ठ” मराठी माध्यमांनी नॅरेटिव्हचा भरपूर इंधनपुरवठा केला होता. पवार करतील ती पूर्व, पवार काहीही करू शकतात, वस्ताद डाव टाकणार वगैरे भाषांनी मराठी माध्यमांनी पवारांच्या नेतृत्वाबरोबरच महाविकास आघाडीची भलामण चालवली होती.
हाताशी जरांगे नावाचे “हत्यार” असल्यामुळे त्याच हत्याराने आपण महायुतीचा राजकीय खात्मा करू, असा अहंगंड पवार + ठाकरे आणि नानांना झाला होता. त्यामुळे आता जो काही संघर्ष होईल, तो केवळ मुख्यमंत्री पदासाठी होईल, असे मानून महाविकास आघाडीचे नेते एकमेकांशी झुंजण्यातच वेळ घालवत राहिले.
… आणि दरम्यानच्या काळात महायुतीने लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा धडा घेऊन लाडकी बहीण योजना आणून त्याच बरोबर भाजपने सगळ्या संघ यंत्रणेला मैदानात उतरवून महाराष्ट्राचे राजकीय मैदान मारले.
त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळेच नेते संतापाने लाल झाले. महाराष्ट्राच्या जनतेने अवघ्या 5 महिन्यांत कौल बदललाच कसा??, या सवालाने त्यांचे डोके भणाणून गेले. महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाल्याचे त्यांना पचनीच पडेनासे झाले. आपले नेमके काय चुकले??, आपण आपल्या पक्षांच्या आणि महाविकास आघाडीच्या संघटनात्मक पातळीवर कुठे कमी पडलो??, मतदारसंघांची यंत्रणा राबविण्यात आपली कुठे चूक झाली??, आपली शक्ती स्थळे जास्त बळकट करण्यामध्ये आपल्याला यश का आले नाही??, आपले नॅरेटिव्ह कुठे चुकले?? वगैरे मुद्द्यांवर आत्मपरीक्षण करण्याऐवजी पवार + ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सरळ सोप्या मार्गाने जाऊन EVMs आपल्या पराभवाचे खापर फोडले.
वास्तविक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा “लोवेस्ट परफॉर्मन्स” आल्यानंतर सुप्रिया सुळे तब्बल 72 तास गायब झाल्या होत्या. पण 72 तासांनंतर बाहेर येऊन त्यांनी आम्ही पराभवाचे आत्मपरीक्षण करू, अशी प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ती कुठल्याही राजकीय पक्षासाठी स्वाभाविक आणि राजकीय दृष्ट्या प्रगल्भ प्रतिक्रिया होती.
प्रत्यक्षात शरद पवारांसकट महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची कृती मात्र आत्मपरीक्षण दिले सोडून आणि परीक्षकाचा गळा धरायला गेले धावून!!, अशी राहिली. म्हणूनच आता महाविकास आघाडीच्या तब्बल 23 उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केले. त्यात बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवारांचा देखील समावेश झाला. ते अजितदादांविरुद्ध 1 लाख मतांनी पडले, पण त्यांना तो पराभव “पचला” नसल्याने त्यांनीही फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करून निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच बोट ठेवले. जितेंद्र आव्हाड यांनी तर महाराष्ट्रात तब्बल 73 लाख मतदार वाढल्याचा “जावईशोध” लावला. मी इंजिनीयर असल्याने मला नक्की माहिती आहे की, EVM हॅक होऊ शकते, असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केले.
बाबा आढावांचे उपोषण
बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने उपोषणाचे हत्यार उपसले. निर्भय बनो आंदोलनवाले विश्वंभर चौधरी, असीम सरोदे वगैरे कार्यकर्ते बाबांभोवती जमा झाले, पण बाबांनी उपोषणाचे हत्यार तीन दिवसांमध्येच म्यान करून टाकले.
तरीदेखील शरद पवारांनी बाबांसमोर उठावाची भाषा वापरून पुढच्या राजकारणाचे “संकेत” देऊन टाकले. हे तेच “संकेत” होते की, आम्ही आत्मपरीक्षण वगैरे करण्याच्या काही फंदात पडणार नाही. पक्षाची संघटना सुधारण्याच्या आणि पक्षाला नवा कुठला मोठा सकारात्मक कार्यक्रम देण्याच्या कटकटी आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये जाऊन आम्ही पक्ष कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी प्रेरित करणार नाही. प्रत्यक्ष निवडणुका आल्या की कार्यक्षम प्रभावी यंत्रणा राबवणार नाही, त्या ऐवजी निवडणूक यंत्रणेवरच बोट ठेवून आमच्या पराभवाचे खापर आम्ही EVMs वरच फोडू!!… आम्ही नापास का झालो??, याचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा परीक्षकाचाच गळा धरायला जाऊ!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App