विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे उत्साहात आलेल्या महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जरूर दिलजमाई झाली. त्यांची एकदिलाने पत्रकार परिषद पार पडली, पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकमेकांमध्येच खेचाखेची सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे आणि सांगली जिल्ह्यामध्ये या खेचाखेचीचा प्रत्यय आला. Major cracks in MVA in sangli and pune assembly constituencies
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रचंड उत्साहात आले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीत दिलजमाई झाल्याची घोषणा सगळ्याच नेत्यांनी केली. आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ किंवा लहान भाऊ नाही सगळे समान आहेत असे ठाकरे + पवार + पृथ्वीराज चव्हाण एकदिलाने बोलले. मात्र या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हजर नव्हते.
एकीकडेही पत्रकार परिषद होऊन एक दिवसही उलटला नाही, तोच पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे आणि सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये बेबनाव झाल्याची बातमी आली. पुणे शहरांमधल्या 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला. त्या पाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते खवळले आणि त्यांनीही त्यातल्या प्रत्येकी 4 मतदारसंघांवर दावा ठोकला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना राष्ट्रवादीला अनुकूल असा एकतर्फी निर्णय घेऊ देणार नाही, असे पुण्यातले काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते सांगू लागले.
लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात आधीच धुसफूस होती. विशाल पाटील यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ही धुसफूस कमी होण्याऐवजी वाढली. विशाल पाटील + विश्वजीत कदम विरुद्ध जयंत पाटील असा सामना आणखी जोमाने रंगू लागला. विशाल पाटील जिंकल्यामुळे आणि ते काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्यामुळे जयंत पाटलांना काटशह देण्यासाठी काँग्रेसची शक्ती वाढली. विश्वजीत कदम हे यांनी वेगवेगळ्या मुलाखतीमधून हे उघडपणे सांगितले. सांगली शहराभोवतीच्या तीन मतदारसंघांवर काँग्रेसने दावा ठोकला. तिथून जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची काँग्रेसची तयारी सुरू झाली.
महाविकास आघाडीतल्या नेत्यांची वरती कितीही दिलजमाई झाली असली, तरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र नेते आणि कार्यकर्त्यांची एकमेकांमधल्याच खेचाखेचीची चुणूक दिसली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App