नाशिक : ताकद आणि आकलनापेक्षा जास्ती फडफड, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्यांची आणि माध्यमांची नेहमीची रडारड!!, अशीच अवस्था महाराष्ट्रातल्या महायुतीच्या प्रचंड विजयानंतर दिसून येते आहे.
वास्तविक महायुती जिंकून आल्यानंतर काही विशिष्ट वेळेमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊन सरकार स्थापन करण्यात काही अडचण नव्हती, पण तसे झाले नाही. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे वरिष्ठ नेतेच घेणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती आणि आहे.
पण दरम्यानच्या काळात मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या चालवून घेतल्या. शिंदे समर्थकांनी देखील त्यांची पोस्टर्स बॅनर्स भावी मुख्यमंत्री म्हणून फडकवून घेतली. विविध मंदिरांमध्ये जाऊन महाआरत्या केल्या. यातून विशिष्ट वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न केला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच कसे हवेत, त्याचे कोणते फायदे महायुतीला होतील, याच्या याद्या शिंदे समर्थकांनी वाचल्या. शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटीची वेळ मागितली. या भेटीतून त्यांना शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंन करायचे होते.
त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतले नेहमीचे यशस्वी कलाकार अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या नावाचे घोडे पुढे दामले. अगदी त्यात विधानसभेचे मावळते उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सुद्धा मागे राहिले नाहीत. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत आणि मी मंत्री व्हावे, असे मला वाटते, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या महत्त्वकांक्षांच्या बातम्या माध्यमांनी रंगवून आणि फुलवून दिल्या. त्या बातम्यांना मराठी अस्मितेची फोडणी दिली.
– लॉबिंग चालणारच नाही
या सगळ्यात सर्वांत मोठा पक्ष भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव फोर फ्रंट वर राहिले. त्यांना 178 आमदारांचा पाठिंबा असल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. त्यांना कुठल्याही सूत्रांनी दुजोरा दिला नाही. कारण मूळात भाजपमध्ये असले लॉबिंग मोदी – शाहांपुढे चालतच नाही. या सगळ्याची जाणीव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळवून टाकला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टपणे सांगून टाकले. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या देखील त्यांनी फेटाळून लावल्या. पण हे सगळे नाराजीच्या बातम्या सुरू झाल्यानंतर 12 तासांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटातून झाले.
पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा वाद आणि त्यावर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे दावे ही बाब काही नवीन नाही. किंबहुना ताकद आणि आकलनापेक्षा जास्ती फडफड, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्यांची आणि माध्यमांची नेहमीची रडारड!!, ही वस्तूस्थिती फार जुनी आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या ऐन भरातल्या काळातली आहे.
वास्तविक बाळासाहेब आणि पवार दोन्ही प्रादेशिक बलदंड नेते त्यांची नावे देखील राष्ट्रीय पातळीवर मोठी, पण ताकद मात्र डबल डिजिट आमदार निवडून आणण्याचीच राहिली. दोन्ही नेत्यांना कधीही आपल्या पक्षांचा आमदार संख्येचा डबल डिजिट आकडा ओलांडताच आला नाही. त्यातल्या त्यात बाळासाहेब कर्तृत्वाने मोठे आणि सुदैवी. कारण ते निदान शिवसेना-भाजप युतीचे निर्विवाद मुख्य नेते तरी होते. त्यामुळे त्यांच्या नावावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मिळून बेरीज ट्रिपल डिजिट व्हायची. शिवाय बाळासाहेब म्हणतील तो मुख्यमंत्री व्हायचा. त्यात भाजप आडकाठी आणायचा नाही. कारण तेव्हा भाजपची तेवढी ताकदच नव्हती.
शरद पवारांच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येत नव्हते. त्यांची मराठी माध्यमांवरची “पकड” मोठी असल्याने मराठी माध्यमांनी नेहमीच पवारांची तळी उचलून धरली. त्यांना कित्येक वर्षे पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये कायम ठेवले. पवारांची स्वतःच्या बळावर खासदार निवडून आणण्याची ताकद नेमकी किती??, असा बोचरा सवाल मराठी माध्यमांनी पवारांना थेटपणे कधीही विचारला नाही. 2019 नंतर तर पवारांची प्रतिमा मराठी माध्यमांनी “चाणक्य” म्हणूनच “विकसित” केली. त्यात त्यांच्या ताकदीचा विचार त्यांनी कायम गोधडीखाली झाकून ठेवला. पवार करतील ती पूर्व, पवार काहीही करू शकतात, पवार उलटी – पालटी गेम फिरवू शकतात, या बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या माथी मारली.
– पोस्टर्स वरचे भावी मुख्यमंत्री
पण शरद पवार आपल्या पक्षातल्या एकाही नेत्याला मुख्यमंत्री का करू शकले नाहीत??, त्याचे नेमके आणि खरे कारण काय??, हा सवाल कधीही मराठी माध्यमांनी त्यांना थेटपणे विचारला नाही. पवारांच्या खऱ्या – खोट्या ताकदीची आणि कर्तृत्वाची भलामण मात्र मराठी माध्यमांनी कायम चालू ठेवली. ती पवार समर्थकांना खरी वाटायला लागली. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर चढायला लागले होते. अनेक नेत्यांना आपण मुख्यमंत्री होणार असे मनापासून वाटायला लागले. त्यात अजित पवारही अपवाद ठरले नव्हते.
पण या सगळ्यात शिवसेना असो, अथवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्या अखंड असोत किंवा दुभंगलेल्या असोत त्यांच्या नेत्यांना कधीही प्रश्न पडला नाही, किंवा माध्यमांनी देखील त्यांना कधी थेट प्रश्न विचारला नाही, की तुमच्याकडे स्वबळावर बहुमत नसताना तुम्ही मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा धरताच कशी??, कधीतरी स्वबळावर बहुमत मिळवायचे, आपला पक्ष तेवढा बळकट करायचा, इतरांचे सगळ्यांचे वर्चस्व झुगारायचे, हा विचार तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते किंवा तुम्ही का करत नाही??, असले बोचरे सवाल विचारायची हिंमत “पवार बुद्धी”च्या माध्यमांनी कधी दाखवली नाही.
त्या उलट “मराठी अस्मिता” “महाराष्ट्राचा स्वाभिमान” वगैरे पोकळ गप्पांमध्ये ठाकरे आणि पवारांचे नेते मश्गुल राहिले आणि मराठी माध्यमांनी त्यांना त्यातच मश्गुल ठेवण्यात धन्यता मानली. वास्तविक “मराठी अस्मिता” आणि “महाराष्ट्राचा स्वाभिमान” हे केवळ पोकळ शब्द नाहीत. पण ते ठाकरे + पवार आणि विद्यमान मराठी माध्यमे यांचे बटिकही नाहीत. त्या पलीकडे जाऊन ते शब्द राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडले गेले आहेत. पण ती ठाकरे आणि पवारांनी आणि त्यांच्या पाठोपाठ मराठी माध्यमांनी त्या शब्दांचे अर्थ संकुचित करून ठेवले.
मराठी नेत्यांना आणि मराठी माध्यमांना मराठी पंतप्रधान तर हवा आहे, पण त्या नेत्याने संपूर्ण देशभर झपाट्याने पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून ते पद मिळवावे. संपूर्ण देशावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करून दिमाखाने पंतप्रधान व्हावे, अशी वातावरण निर्मिती ना कुठला कधी मराठी नेता करू शकला, ना कुठल्या मराठी माध्यमांनी त्या पद्धतीने काम करून दाखविले!!
त्यामुळेच ताकद आणि आकलनापेक्षा जास्ती फडफड, हीच महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्यांची आणि मराठी माध्यमांची नेहमीची रडारड राहिली. ही दारूण आणि बोचणारी असली तरी वस्तुस्थिती आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App