स्पर्धेतून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मिशन ऑलंपिक 2036’ मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलंपिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.Inauguration of National Sports Tournament at Ballarpur; Tenfold increase in the award amount of sportspersons by the state government – Chief Minister Eknath Shinde
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलंपिकची सुरवात झाली असून सन 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतील, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
खेलो इंडिया, फिट इंडिया, उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, 2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा जोरकसपणे पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांची प्रशासकीय चमू ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून महाराष्ट्राची संस्कृती वाढविण्याचे काम श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल असे या क्रीडा स्पर्धाचे आयोजन असल्याचे ते म्हणाले राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलंपिकची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बल्लारपूरात होणा-या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त करणारे खेळाडू मिळतील, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील ऑलिंपिक व एशियन स्पर्धेमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन श्री फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव कमावणारे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळामुळे खेळातून आत्मविश्वास निर्माण होतो खेळ भावनेतूनच व्यक्तिमत्व पूर्ण होते. क्याक हार में क्या् जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही, वह भी सही….या कवितेच्या ओळींचा त्यांनी उल्लेख केला. तसेच जय पराजयाच्या विचार न करता देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंनी खेळावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. आवाहन केले.
मिशन ऑलंपिक 2036 मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भुमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मिशन ऑलंपिक 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरीता बल्लारपूर येथे आलेला प्रत्येक खेळाडू यश घेऊन जाईल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हाप्रशासनाने अतिशय मेहनत घेतली आहे. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे आयोजन उत्कृष्ट : क्रीडा मंत्री संजय बनसोडे
संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलंपिक 2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजीत कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपुर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने खेळाडूंना शपथ दिली.
अभुतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला ‘लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले.
खेळाडूंचे फ्लॅगमार्च : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी शिस्तबध्द पध्दतीने फ्लॅगमार्च करीत आपापल्या राज्याचे दर्शन घडविले. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास 1551 खेळाडू चंद्रपुरात दाखल झाले आहेत.
चंद्रपूर गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे विमोचन : पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाला आमदार रामदास आंबटकर, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरे, जिल्ह्याधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दुरसिंह चव्हाण, धावपटु हिमा दास, ललिता बाबर, बैडमिंटन पटू मालविका बनसोड आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App