छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्य्यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे, तर सत्ताधारी पक्षाकडूनही पुतळा कोसळ्यामागे राजकीय कट असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
तसेच मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
याचबरोबर आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
”मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !”
याशिवाय पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.अशी टीकाही केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App