सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chatrapati shivaji maharaj
शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार
राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर
विशेष प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणाा घेऊन महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. chatrapati shivaji maharaj
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील 289 कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.
सी.एम. म्हणजे कॉमन मॅन असल्याचे समजून कार्य करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. लोकांच्या हाताला काम देण्याचे कार्य शासन करीत आहे. समाजातल्या विविध घटकांसाठी अत्यंत महत्वकांशी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून कार्य करित असल्यानेच महाराष्ट्र आज उद्योग, विकास, पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी बाबींमध्ये अग्रेसर आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेमुळे महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. ही योजना कधीही बंद न होता टप्प्याटप्प्याने यामध्ये मिळणाऱ्या निधीत वाढ होत राहिल. वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये देण्यात येत असलेली शेतकरी सन्मान योजना, राज्यातील युवकांना हाताला काम देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण भत्ता देण्यात येत असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पावर मोफत वीज योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, तिर्थदर्शन योजना यासारख्या अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळे राज्याच्या व सामान्य माणसांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील.
Rohit Pawar : स्टालिन यांनी वारस नेमला उदयनिधी; पवारांचीही नातवाला गादीवर बसवायची घाई!
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन चालणारे राज्य आहे. येणाऱ्या शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभा करुन त्यांना अभिवादन करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाटण येथे मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवारायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्याच धर्तीवर पाटण येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण तालुका डोंगरदऱ्यामध्ये विखुरलेला आहे. यापूर्वी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी फार बिकट अवस्था होती. या तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले. दरे, जावळी, तापोळा या डोंगरी भागाप्रमाणे पाटण हा डोंगरी तालुका आहे. जिल्ह्यातील जल पर्यटनाला चालना देण्याचे काम करण्यात आले. तारळी नदी उपसा सिंचन प्रकल्पातील पाणी १०० मीटरपर्यंत पोहोचवले. मोरणा गुरेघरच्या उजव्या- डाव्या कालव्याला बंदिस्त पाईप लाईन करण्याचे काम दोन दिवसात सुरू होईल. नाटोशी हे संपूर्ण गाव आणि वाड्या- वस्त्या पाण्यापासून वंचित होत्या. त्यासाठी जलसिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगून पाटण तालुक्यातील नाडेगावात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी भागातील विकासासाठी पूर्वी मंजूर केलेला २०० कोटींचा आचार संहितेपूर्वी निधी मिळाल्यास कामे सुरु करता येतील. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली ता.पाटण ५ कोटी रुपयांचे कामांचा लोकार्पण, नाडे ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण, वाटोळे ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे ९४ कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भुमिपुजन तारळी प्रकल्पामधील ५० मी व १०० मी उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या ७९ कोटींच्या कामांचा लोकार्पण, पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन, मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालयाच्या नूतनीकरण इमारतीचे लोर्कापण आदींचे विकासाचे भूमीपुजन व लोर्कापण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, पाटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App