विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या दिवशी शिमगा करायची विरोधकांना सवय आहे त्याला आमची हरकत नाही राहुल गांधींनी पण मारकडवाडी मध्ये जाऊन बॅलेट पेपर वर मतदान घेऊन तिथे प्रतिसरकार स्थापन करावे, पण पहिले 6 महिने तरी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे, मग उरलेली साडेचार वर्ष स्वतः पंतप्रधान व्हावे, अशा शब्दांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडी बॅलेट पेपर लाँग मार्चची खिल्ली उडवली.
शरद पवार आणि राहुल गांधी सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी मध्ये एकत्र येऊन बॅलेट पेपर निवडणूक लाँग मार्चची सुरुवात करणार आहेत. विरोधकांचे हे ईव्हीएम विरोधातले सगळ्यात मोठे आंदोलन उभे करण्याचा त्यांचा इरादा आहे. काँग्रेसने आधीच भारत जोडू यात्रेसारखी बॅलेट पेपर यात्रा काढायची घोषणा केल्यानंतर मारकडवाडी आंदोलनाची आयडिया पुढे आली.
मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्या आंदोलनाची खिल्ली उडवली. विरोधकांनी आमदारकीच्या शपथेवर बहिष्कार घालणे हा त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहे दिवाळीच्या दिवशी शिमगा करायची त्यांची जुनी सवय आहे. त्याला आमची हरकत नाही, असे सांगून पडळकर म्हणाले, खरंतर राहुल गांधींनी मारकडवाडी मध्ये येऊन त्यांच्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन तिथे प्रतिसरकार स्थापन करावे, पण पहिले 6 महिने तरी, त्यांनी शरद पवारांना मारकडवाडीचे पंतप्रधान करावे. मग उरलेली साडेचार वर्षे स्वतः पंतप्रधान व्हावे!!
महाराष्ट्रात पण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी असेच समांतर मतदान घेऊन प्रतिसरकार स्थापन करावे मग जयंत पाटील, सुप्रिया सुळे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात वगैरे सगळ्या नेत्यांना चार – चार महिने मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी, म्हणजे त्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे समाधान होईल, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App