विनायक ढेरे
नाशिक : आजचा दिवस राजकीय घाबरण्याचा दिसतो आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत!!…From Delhi to Mumbai… Congress – NCP and BJP are targeting each other of frightening each other
राहुल गांधींचा आरोप
आजचा दिवसच मूळात घाबरणे डरणे, भीती वाटणे या शब्दांनी सुरू झाला आहे. कारण राजधानी नवी दिल्लीत काँग्रेसचे महागाई बेरोजगारी या विषयावर महाआंदोलन सुरू आहे. संसदेपासून काँग्रेस मुख्यालयापर्यंत त्याच विषयाची चर्चा आहे. पण त्याचवेळी काँग्रेस मुख्यालयात खासदार राहुल गांधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा केंद्रबिंदू घाबरणे या शब्दाभोवतीच केंद्रित झालेला दिसला. सरकार आम्हाला घाबरते. गांधी परिवाराला डरते म्हणूनच ते महागाई, बेरोजगारीच्या चर्चेपासून पळ काढते. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही म्हणून सरकार घाबरते आणि केंद्रीय तपास यंत्रणा गांधी परिवाराच्या मागे लावून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते पण आम्ही घाबरत नाही. डरत नाही. आम्ही मुकाबला करू. लोकांना सत्य सांगत राहू, असे राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.
रविशंकर प्रसादांचे प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांची प्रेस कॉन्फरन्स देखील घाबरणे या शब्दाभोवतीच केंद्रित होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड केस मध्ये भ्रष्टाचार केला आहे. तो केंद्रीय तपास यंत्रणाच्या तपासात आता उघड होत असल्यामुळे ते घाबरत आहेत. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चा करते तेव्हा ते चर्चेपासून पळून जातात आणि बाहेर जाऊन पत्रकार परिषदांमध्ये सरकार घाबरण्याचा आरोप करतात, असा प्रत्यारोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
अजितदादांचा शिंदे – फडणवीसांना टोला
राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस आणि भाजप यांचे नेते एकमेकांवर असा घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा आरोप करत असताना मुंबईत त्याचे वेगळे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन एक महिना झाला तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. दोनच मंत्री राज्यकारभार चालवत आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांना घेरले आहे आणि त्यांनी देखील पत्रकारांशी बोलताना घाबरणे याच शब्दाचा प्रयोग केला आहे. शिंदे फडणवीस आपल्या सरकारचा आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहेत?, हे समजायला मार्ग नाही, असा टोला अजित पवारांनी दोन्ही नेत्यांना लगावला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाची धास्ती
महाराष्ट्रात समस्या वाढत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला दोन मंत्री पुरत नाहीत. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हवा आहे आणि ते मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंत मिळणार नाहीत. हे दोन्ही नेते मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरतात?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टात लटकले आहे. याकडेच अजित पवारांचा अंगुलीनिर्देश आहे आणि त्यामुळेच त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी विस्ताराला शिंदे फडणवीस घाबरत असल्याचा टोला हाणला आहे.
इएमआय वाढल्याने मध्यमवर्गीय चिंतेत
तिसरीकडे रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केल्याने गृह आणि वाहन कर्जांचा एम आय मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळे मध्यमवर्गीय घाबरला आहे महागाईचा दर 7.1% राखण्यासाठी रेपोदरात वाढ केल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. पण 2022 मध्ये तिसऱ्यांदा रेपोदरात वाढ केल्याने गृह कर्जाच्या आणि वाहन कर्जाच्या हप्त्यामध्ये मात्र वाढ झाली आहे. या महागाईचा मध्यमवर्गीयाला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे तो चिंतेत आहे. वरच्या दोन्ही चिंता राजकीय असल्या तरी महागाई वाढल्याची आणि ईएमआय वाढल्याची चिंता मात्र राजकीय नाही. ती आर्थिक आणि खरी आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App