विशेष प्रतिनिधी
सातारा : इंग्लंडच्या म्युझियम मधून आणलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर विरोधक अकारण राजकारण करताहेत. त्यांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ही बुरशी आणि गंज काढायचे काम मुख्यमंत्री या वाघनखांनी करतील, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. Fadnavis scolded from Satara
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला, ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियम येथून साताऱ्यात आली आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. या वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा आज झाला. या कार्यक्रमाला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. संबंधित वाघनखे हे शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा विरोधी पक्षांचे नेते करताहेत. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
आपल्या सर्वांकरता आजचा क्षण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या अफजल खानाचा वध केला होता, तो चित्तथरारक प्रसंग पिढ्यांपिढ्या आपण सगळे ऐकत आलो. त्याच प्रसंगांमधील जे प्रमुख शस्त्र होतं ती वाघनखं जी अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती ती आपल्या भारतात या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थाने आमची राजधानी असलेल्या साताऱ्यात वस्तू संग्रहालयात आपल्या सर्व भारतीयांना आणि शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध झाली, मला असं वाटतं, यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही.
– छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विनंती केली की, या वाघनखांवरुन विवाद करु नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे की, उठसूट प्रत्येक गोष्टीत काहीना काही विवाद निर्माण करायचा. हे असंच असेल तर, हे तसंच असेल तर??, पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही. या रोगाचा सामना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनादेखील करावा लागला होता. स्वराज्यातही काही अशी लोकं होती जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सर्व शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं.
– मला विश्वास आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघनखं दिली. आता कुणाचा कोथळा काढायचा नाही. पण काहींच्या बु्द्धीवर बुरशी आली आहे. काहींच्या बुद्धीवर गंज चढला आहे. मुख्यमंत्री त्यांची या वाखनखांनी बुरशी आणि गंज उतरवण्याचं काम निश्चितपणे कराल हा मला विश्वास आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App