नाशिक : हरियाणा विधानसभेच्या निकालातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले नव्हे, पण Exit Poll वालेच धडा शिकले, असे म्हणायची वेळ एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी आणली.
कारण हरियाणा विधानसभेच्या निवडणूक निकालापूर्वी सगळ्या एक्झिट पोलवाल्यांनी तिथे काँग्रेस पूर्ण बहुमतानिशी जिंकणार, भाजपला धक्का बसणार, परिणामी केंद्र सरकार देखील हादरणार, वगैरे भाकिते केली होती. एकही एक्झिट पोल संस्था अशी नव्हती, की जिने हरियाणा सलग तिसऱ्यांदा भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे काँग्रेसवाले देखील प्रचंड खुश झाले होते. आता फक्त मतमोजणी व्हायचा अवकाश, आपण सत्तेवर आलोच आणि आपला मुख्यमंत्री खुर्चीवर बसलाच, अशा भ्रमात ते वावरत होते.
पण निवडणूक निकाल भलतेच लागले. काँग्रेसचा धुव्वा उडाला. हरियाणाच्या “भावी मुख्यमंत्र्यांची” करिअर खराब झाली. भूपेंद्र सिंग हुड्डा यांचे राजकीय करिअर संपुष्टात आले. भाजप पूर्ण बहुमतांशी सत्तेवर बसला.
हरियाणातल्या निकालातून खरं म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात धडा शिकायला हवा होता. लोकसभा निवडणुकीतला अडवांटेज टिकवायला हवा होता. जागावाटपाचा घोळ लवकर निस्तरून महाविकास आघाडीने प्रचारात नवे मुद्दे आणून आघाडी घ्यायला हवी होती. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले जुन्याच जातीय अजेंड्यावर काम करत राहिले, “जरांगे फॅक्टर” वर भरोसा ठेवत राहिले. हिंदूंच्या मतांमध्ये फूट पाडली, जातीय अजेंडा राबविला आणि मुस्लिम मत नेहमीप्रमाणे आपल्या बाजूने खेचले की आपला विजय पक्का, या “माध्यम निर्मित चाणक्यांच्या” फॉर्म्युलात काँग्रेस आणि ठाकरे फसले.
हरियाणातील निकालातून महाविकास आघाडीवाले काहीही शिकले नाहीत. भाजप हिंदुत्वाचे कार्ड प्रभावी खेळू शकतो, छोट्या जात समूहांना एकत्र आणण्यासाठी जमिनी स्तरावर काम करू शकतो, छोटे जातसमूह एकत्र येऊन मोठ्या माशांना देखील पराभूत करू शकतात याचा अंदाजच महाविकास आघाडीवाल्यांना आला नाही, तो अंदाज एक्झिट पोलवाल्यांना उशिरा का होईना, पण आला. कारण ग्राउंड वर काम करण्याची एक्झिट पोलवाल्यांना देखील पर्याय नव्हता.
– संघ मैदानात उतरला
संघाच्या 65 संघटना ग्राउंडवर काम करून मतदारयाद्या अपडेट करून सोसायट्यांमधल्या निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय मतदारांना खेचू शकतात, वाड्या, वस्त्या, कॉलनी इथल्या मतदारांना प्रोत्साहित करून मतदान केंद्रापर्यंत आणू शकतात हे एक्झिट पोलवाल्यांना जाणवले. त्याचे प्रतिबिंब एक्झिट पोल मधल्या निष्कर्षांमध्ये पडले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 11 पैकी 6 एक्झिट पोल मध्ये महायुती सत्तेवर येईल, असा निष्कर्ष निघाला. 4 एक्झिट पोलनी महाविकास आघाडीला कौल दिला. एका एक्झिट पोलने त्रिशंकू विधानसभा दाखवली.
पण सगळ्याचा निचोड हाच निघाला की, “जरांगे फॅक्टर” फक्त मराठवाड्यात थोडाफार चालला, पण जात वर्चस्वाचा अजेंडा महाराष्ट्राने धुडकावला, संविधान बदलाचा अजेंडा लोकसभेत चालला, तो विधानसभेत फेल गेला, काका फक्त पुतण्याला भारी ठरले, भाजपावर भारी ठरू शकले नाहीत, ठाकरे फॅक्टर निष्प्रभ झाला.
– नवी स्ट्रॅटेजी ठरविण्यात अपयश
हा सगळा निचोड एक्झिट पोलवाल्यांना दाखवावा लागला. कारण त्यांना तो महाराष्ट्राच्या ग्राउंड वर दिसला. हरियाणासारखा काँग्रेसनिष्ठ निष्कर्ष दाखवून एक्झिट पोलवाल्यांना मोकळे होता आले नाही. कारण ते हरियाणातल्या अपयशातून थोडेफार तरी शिकले, पण काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले बिलकुल शिकले नाहीत. कारण त्यांनी हिंदू समाजात फूट पाडून जात वर्चस्वाचा जुनाच अजेंडा चालवायचा प्रयत्न केला. नवी स्ट्रॅटजी आखून लोकसभेतला वरचष्मा टिकवून धरण्याचे कसब त्यांना साधता आले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App